अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते 'या' गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय
झोपेची गुणवत्ता खराब होण्याची कारणे?
झोपेची कमतरतेमुळे उद्भवणारे आजार?
शांत झोपेसाठी काय करावे?
दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला विश्रांतीची फार आवश्कता असते. सतत काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांची जबाबदारी इत्यादी अनेक गोष्टीमुळे आरोग्याची काळजी घ्याला जास्त वेळ मिळत नाही. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे खूप जास्त दुर्लक्ष होते. बऱ्याचदा शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात झोप न घेतल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. तसेच डोळ्यांभोवती काळी वर्तुळ वाढणे, सतत डोकेदुखी इत्यादी बरीच लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे फार आवश्यक आहे. झोपल्यानंतर मेंदू दिवसभरातील माहितीची साठवणूक करण्यासोबतच त्वचेच्या पेशी दुरुस्त करतो. ज्यामुळे सकाळी उठल्यानंतर चेहरा खूप जास्त फ्रेश वाटतो.(फोटो सौजन्य – istock)
डॉक्टरांच्या मते, आदल्या दिवशी घेतलेल्या अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस मानसिक तणावात जातो. वारंवार डोकं दुखणे, कामात व्यवस्थित लक्ष न लागणे इत्यादी समस्या उद्भवून सतत चिडचिड होते. वारंवार ७ तासांपेक्षा कमी झोपल्यामुळे जुनाट आजारांचा धोका खूप जास्त वाढतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे रक्तातील साखर, हृदयाचे ठोके आणि हार्मोनच्या संतुलनावर परिणाम होतो.चला तर जाणून घेऊया अपुऱ्या झोपेमुळे शरीरसंबंधित कोणते आजार उद्भवतात.
वारंवार ७ तासांपेक्षा जास्त वेळ झोप न घेतल्यास केवळ शरीरावरच नाहीतर मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूतील ‘न्यूरॉन्स’ एकमेकांशी संपर्क साधण्यास असमर्थ ठरतात. ज्याच्या परिणामामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. गाढ झोपल्यानंतर मेंदू ग्लिम्फॅटिक सिस्टिम द्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतो. पण अपुऱ्या झोपेमुळे हे विषारी घटक शरीरात तसेच साचून राहतात आणि झोपेचे संतुलन बिघडण्यासोबतच नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा पूर्णपणे कमी होऊन जाते.
मानवी शरीराला झोप फार आवश्यक असते. शांत झोप घेतल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते. शांत झोपेमध्ये असताना हृदयाच्या रक्तदाब कमी होऊन जातो, ज्याच्या परिणामामुळे हृदयाला विश्रांती मिळते. कमी झोपणाऱ्यांच्या शरीरात ‘कॉर्टिसोल’ हार्मोन वाढतो आणि रक्तवाहिन्यांवर जास्तीचा तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे कोणत्याही क्षणी उच्च रक्तदाब, अनियमित हृदयाचे ठोके आणि हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते.
झोप आणि भूक यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे.’लेप्टिन’ आणि ‘घ्रेलीन’ हे हार्मोन्स एकमेकांशी संबंधित असतात. वारंवार शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यास वजनावर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढवणाऱ्या हार्मोनची पातळी वाढते आणि सतत काहींना काही खाण्याची इच्छा होते. यामुळे सतत गोड पदार्थ खाण्याची किंवा हाय-कॅलरी पदार्थ खाण्याची इच्छा जास्त वाढते. जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे वजन झपाट्याने वाढते.
शांत आणि गाढ झोप येण्यासाठी एक ग्लास कोमट दुधात हळद आणि जायफळ पावडर मिक्स करून प्यायल्यास सकारात्मक परिणाम दिसू लागतील. याशिवाय नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे फार आवश्यक आहे. तसेच झोपण्याच्या १ किंवा २ तास आधी मोबाईल किंवा लॅपटॉप काहीच पाहू नये. दुपारच्या जेवणानंतर कमीत कमी २ तास चहा किंवा कॅफिन असलेले पेय पिऊ नये.






