२३ ऑक्टोबर २०२४ रोजी नारायण इंगळे हे त्यांचे मित्र प्रल्हाद इंगळे यांच्यासह मंगरूळपीर मार्गावरील राजमुद्रा राजा हॉटेलजवळ चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी नारायण इंगळे यांचे मेहुणे विशाल महाले, सचिन महाले आणि अनिल महाले यांनी संगनमताने त्यांच्यावर हल्ला केला. ‘आमच्या बहिणीला मारता का?’ असे म्हणत लोखंडी रॉड आणि प्लास्टिकच्या पाईपने त्यांना बेदम मारहाण करण्यातआली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नारायण इंगळे यांना उपचारासाठी मंगरूळपीर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास वाशिम ग्रामीण पोलिसांकडे सोपविण्यात आला.
या प्रकरणाचा निकाल जिल्हा न्यायाधीश-१ जे. पी. झपाटे यांच्या न्यायालयाने १ ऑगस्ट रोजी दिला. न्यायालयाने आरोपी विशाल उर्फ किसाना वसंत महाले (२८), सचिन वसंत महाले (२५) आणि अनिल उर्फ जगदीश परशराम महाले (२१, सर्व रा. जांभूरुण महाली, ता. जि. वाशिम) यांना भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १०५ (२) सह कलम ३(५) अन्वये दोषी ठरवून प्रत्येकी पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील चौथी आरोपी व मृताची पत्नी शारदा नारायण इंगळे (वय ३७हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ४९ अंतर्गत आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्याआधारे नारायण इंगळे यांचा मृत्यू मेहुण्यांकडून झालेल्या मारहाणीमुळे झाल्याचे न्यायालयाने ग्राह्य धरले. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता पी. एस. ढोबळे यांनी कामकाज पाहिले, तर अॅड. राहुल एम. पुरोहित यांनी त्यांना सहकार्य केले. प्रकरणाचा तपास तत्कालीन वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ठाणेदार श्रीदेवी पाटील यांनी केला. तपास कार्यात भैरवी अजय शिंदे आणि पोलिस कॉन्स्टेबल किरण तायडे यांनी सहकार्य केले.
खामगावात ढगफुटीसदृश पाऊस; जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यांना फटका






