Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 12.09.2026
आज १२ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे दिमाखात उद्घाटन, महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणानंतर मुंबईकडे कूच आणि आशियाई बाजारातील संमिश्र संकेतांमुळे शेअर बाजारातील व्यवहार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आजपासून २ दिवसीय १८ व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून दिल्लीत विशेष सुरक्षा व वाहतूक मार्ग बदल लागू करण्यात आले आहेत.
मराठा आरक्षणाच्या तीव्र मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बैठकीनंतर मुंबईकडे जाण्याची घोषणा केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
मुंबईतील गुरु तेग बहादुर नगर मोनोरेल स्टेशनवर रात्री लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवले असून राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
12 Sep 2026 10:10 AM (IST)
गणेशोत्सवासाठी कोकणासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या गावाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघातून यंदाही मोठ्या प्रमाणावर मोफत एसटी बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभेतून यंदा तब्बल ११०० हून अधिक एसटी बसेस विविध जिल्ह्यांकडे रवाना होणार असून, सुमारे ४५ ते ५० हजार गणेशभक्तांना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. गुरुवारपासून कल्याण-शीळ रोडवरील प्रीमियर कंपनी मैदान, संदप येथे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. डोंबिवली, कल्याण पूर्व, दिवा यासह अंबरनाथ, उल्हासनगर आणि कळवा परिसरातून बसेस रवाना होणार आहेत. यामध्ये डोंबिवलीतून सुमारे ३५०, कल्याण पूर्वेतून २१०, तर दिव्यातून १५० हून अधिक बसेस जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
12 Sep 2026 09:55 AM (IST)
Kokan GaneshotsavSpecial Trains: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर व आरामदायी व्हावा, यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने चार अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत या विशेष गाड्या धावणार आहेत.
सीएसएमटी-सावंतवाडी रोड (गाडी क्र. ०१००९) ही अनारक्षित विशेष गाडी १२ आणि १३ सप्टेंबरला दुपारी १.४५ वाजता सीएसएमटीहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. सावंतवाडी रोड-सीएसएमटी (गाडी क्र. ०१०१०) ही गाडी १३ आणि १४ सप्टेंबरला पहाटे ४.०५ वाजता सावंतवाडीहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
12 Sep 2026 09:45 AM (IST)
Baramati Missing Girl Safe Return: घरगुती कारणांमुळे आई-वडिलांसोबत न राहता मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली तरुणी अखेर सुरक्षितपणे घरी परतली आहे. बारामती शहर पोलिसांच्या विशेष मिसिंग पथकाने तातडीने तपास करत तिचा शोध घेतला.
१० सप्टेंबर रोजी तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर बारामती शहर पोलिसांच्या विशेष पथकाने तांत्रिक आणि मानवी माहितीच्या आधारे तिचा शोध घेतला.महिला पोलिसांनी तरुणीला विश्वासात घेऊन तिचे संवेदनशील समुपदेशन केले असता, तिला कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिच्या वैयक्तिक छायाचित्रांचा (फोटो) गैरवापर करण्याची धमकी दिल्याची गंभीर बाब समोर आली.
12 Sep 2026 09:35 AM (IST)
Manoj Jarange Patil Hunger Strike: मराठा आरक्षणातील कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात पुन्हा एकदा तीव्र एल्गार पुकारला आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज १५ वा दिवस असून सरकारच्या शिष्टमंडळाने अद्याप त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण १५ व्या दिवशीही सुरूच आहे. मुंबईत परवानगीशिवाय आंदोलन न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू सणांचे औचित्य साधून आंदोलकांना भावनिक साद घातली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आपल्याला असल्याचे ठणकावत जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
12 Sep 2026 09:25 AM (IST)
Baba Ramdev Ayurvedic Hookah E-Cigarette: आजकाल तरुणांमध्ये ई-सिगारेट आणि फ्लेवर्ड हुक्काची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते हे प्रकार आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. ई-सिगारेट आणि हुक्क्यामुळे फुफ्फुसांचे विकार व कर्करोगाचा धोका वाढतो, असा आरोग्य तज्ज्ञांचा इशारा आहे. या धोकादायक ट्रेंडदरम्यान योगगुरू बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ते 'आयुर्वेदिक हुक्क्या'बाबत सांगताना दिसत आहेत. हा आयुर्वेदिक हुक्का आरोग्यासाठी घातक नसून फायदेशीर ठरू शकतो, असा दावा बाबा रामदेव यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे.
12 Sep 2026 09:15 AM (IST)
Madhuri Elephant Returns: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील प्रसिद्ध नांदणी मठात अखेर १३ महिन्यांनंतर 'माधुरी' हत्तीचे पुनरागमन झाले आहे. मागील काही महिन्यांपासून गुजरात येथील 'वनतारा' पुनर्वसन केंद्रात असलेली माधुरी हत्ती न्यायालयीन प्रक्रिया आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानंतर पुन्हा कोल्हापुरात परतली आहे.
वनताराचे सीईओ विवान कर्णिक व त्यांच्या टीमने माधुरीला नांदणी मठात आणल्यानंतर तिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि स्वागतासाठी सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास माधुरी मठात पोहोचली, तरी तिच्या स्वागतासाठी नागरिकांनी नांदणी मठाजवळ प्रचंड गर्दी केली होती.
12 Sep 2026 09:05 AM (IST)
नवी दिल्ली : भारताने आयोजित केलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शनिवारी (दि.12) दुपारी दिल्लीत दाखल होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, शी जिनपिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहे. यापूर्वी, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि आफ्रिकन देश नायजेरिया येथील इतर अनेक पाहुणेही भारतात दाखल झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेतील मोठे बदल, बदलत्या व्यापार पद्धती, जलद तांत्रिक प्रगती आणि हवामान संकटाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स गट आज एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे.






