सातारा : महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने केलेली कारवाई या घटनांचा सातारा जिल्हा शिवसेना कार्यकारणीच्या वतीने निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी आज पोवई नाक्यावर शिवपुतळा परिसरात जोरदार निदर्शने केली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या आंदोलनात सातारा जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते, शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे जोरदार पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशी शिवसेनेचे खासदार यांची ईडीने ते नऊ तास चौकशी करून त्यांना अखेर ताब्यात घेतले. या दोन्ही घटनांचा सातारा जिल्हा शिवसेना कार्यकारणीच्या वतीने सोमवारी दुपारी पोवई नाक्यावर शिवपुतळा परिसरात जोरदार निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्रात आलेलं काळ्या टोपीचं पार्सल परत पाठवा, अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.
शिवसैनिकांची खंत व्यक्त करताना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते म्हणाले, राज्यपालांनी वेळोवेळी महाराष्ट्राच्या जनभावनांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवरायांबद्दल सुद्धा बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल यापूर्वीही खपवून घेतले गेले. महाराष्ट्रातील सुधारणावादी विचारवंतांच्या बाबतीतही त्यांनी आकस बुद्धीने वक्तव्य केली आहेत. या सर्व घटनांचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. या घटनांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने रविवारी सुट्टीच्या दिवशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे, हे चुकीचे आहे. महाराष्ट्रात असले प्रकार शिवसैनिक खपवून घेणार नाही, त्यामुळेच आम्ही शिवसैनिक या घटनांचा निषेध करत आहोत, असे सचिन मोहिते म्हणाले.
[read_also content=”भाळवणी जिल्हा परिषद गटाची दोरी महिलांच्या हाती; इच्छुकांच्या अपेक्षांवर फिरले पाणी https://www.navarashtra.com/maharashtra/bhalwani-zilla-parishad-group-in-the-hands-of-women-water-swirled-on-the-expectations-of-the-aspirants-nrdm-310583.html”]
या आंदोलनात सातारा तालुका प्रमुख अनिल गुजर, शहर प्रमुख शिवराज टोणपे, शहर संघटक प्रणव सावंत, राहुल गुजर, रवी भणगे, इम्रान बागवान, आझाद शेख, सागर धोत्रे, लक्ष्मण जाधव, सुमित नाईक, गणेश अहिवा ले इं शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलकांच्या निदर्शनानंतर पोवई नाक्यावर बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची शहर पोलिस ठाण्यात रवानगी केली, त्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले.