
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन 577 मतांनी विजयी
Marathi Breaking News Updates : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल (Vidhan Parishad Election Result 2026) जाहीर झाला आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली होती. मात्र या निवडणुकीआधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आला. 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे.
22 Jun 2026 06:10 PM (IST)
फिफा विश्वचषक 2026 ( FIFA World Cup 2026) मध्ये ‘गट जे’ मधील ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी फिफा विश्वचषक इतिहासात आणखी एक विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. अल्जेरियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने ३-० अशा विक्रमी कामगिरी केली. अल्जेरियाविरुद्ध, मेस्सीने केवळ आपली पहिली विश्वचषक हॅट-ट्रिकच केली नाही, तर अर्जेंटिनासाठी आपला २०० वा सामनाही खेळला. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे गतविजेत्या अर्जेंटिनाला आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात करण्यास मदत झाली. ३८ वर्षीय मेस्सी आता ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात तीन नवीन विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे.
22 Jun 2026 05:55 PM (IST)
राजधानी लखनौमधील अलिगंजच्या पुरानिया परिसरात सोमवारी (22 जून 2026) लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहराला धक्का बसला आहे. या आगीच्या घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मृतांचे वय २० ते २४ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. इमारतीला अचानक आग लागली आणि काही मिनिटांतच ती धूर व आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. परिसरात घबराट पसरली असून आगीतून जीव वाचवण्यासाठी नागरिक धावू लागले.
22 Jun 2026 05:50 PM (IST)
सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 226 स्पर्धा सुरू आहे. भारतीय महिला संघ ग्रुप 2 मधून खेळत आहे. तीन पैकी दोन सामन्यात भारताने विजय प्राप्त केला आहे. तर कालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र या तीनही सामन्यांमध्ये श्री चरणी या स्पिनरने अचूक अन् भेदक गोलंदाजी करत आपल्या नावावर नवा रेकॉर्ड केला आहे. कालच्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारताचा पराभव केला आहे. या सामन्यात भारताची फिरकीपटू श्री चरणीने शानदार गोलंदाजी केली. तिने कालच्या सामन्यात 24 रन्स देत 3 विकेट्स पटकावल्या.
22 Jun 2026 05:40 PM (IST)
राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली होत असून घडामोडीना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे फुटीर खासदार यांचे मुंबईत आगमन झाले असून काही लवकरच ते शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेशाची घोषणा करणार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. अश्यातच आता मोठी बातमी येत असून फुटीर खासदारांपैकी दोघांना चक्क मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
22 Jun 2026 05:30 PM (IST)
फॅटी लिव्हर हा आज भारतीय कुटुंबांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आरोग्याचा गंभीर प्रश्न ठरत आहे. अनेकांना आपण या आजाराने ग्रस्त असल्याची कल्पनाही नसते. पूर्वी केवळ मद्यपानामुळे होणारा हा आजार अशी ओळख असलेला फॅटी लिव्हर आज प्रामुख्याने लठ्ठपणा आणि चयापचयातील (मेटाबॉलिक) बिघाडामुळे वाढत असून, भारतीय पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
22 Jun 2026 05:18 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडत अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा बंडखोर खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
22 Jun 2026 04:57 PM (IST)
सुट्ट्यांचा हंगाम किंवा सणासुदीचे दिवस आले की आपण सहकुटुंब लांबच्या प्रवासाला निघतो. डिकीत पुरेशी जागा नसल्यामुळे अनेकदा छतावरील कॅरियरवर भरपूर सामान बांधले जाते. अनेक लोकांचा असा समज असतो की सामानाच्या केवळ ‘वजनामुळे’ गाडीचे मायलेज कमी होते; पण हायवेवर वेगाने गाडी चालवताना वजनापेक्षा मोठा शत्रू असतो तो म्हणजे ‘हवेचा अडथळा’. यामागे ‘एरोडायनॅमिक्स’चे विज्ञान दडलेले आहे. चला तर मग समजून घेऊया, छतावर सामान बांधल्यामुळे नेमके काय होते आणि तुमचे इंधन कसे वाया जाते. वाचा सविस्तर..
22 Jun 2026 04:47 PM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. शिवसेनेच्या सहा खासदाराना फोडण्यात त्यांना यश आले असून आज (सोमवार, 22 जून) हे सहाही खासदार अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा करणार आहेत. यासाठीच आज खासदारांचे आज मुंबईत आगमन झाले असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी पोहोचले आहेत. वाचा सविस्तर...
22 Jun 2026 04:37 PM (IST)
सध्याची जागतिक परिस्थिती पाहता कधी कोणाचं काय बिनसेल सांगता येत नाही. त्यामुळे या अशा जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक गोष्टींसाठी पर्याय शोधणं कधीही सोयीचं ठरतं. आता एलपीजी सिलिंडरला पर्याय म्हणून इथेनॉलचा विचार केला जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचा अर्थ असा की, पेट्रोलमध्ये मिसळल्यानंतर भविष्यात इथेनॉलचा वापर स्वयंपाकाचे इंधन म्हणूनही केला जाऊ शकतो. नेमका काय आहे हा प्रकल्प समजून घेऊयात. वाचा सविस्तर...
22 Jun 2026 04:27 PM (IST)
बोरगाव पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने नुकत्याच उघडकीस आणलेल्या कॉपर वायर चोरी प्रकरणामुळे उंब्रज परिसरातील अनेक जुन्या गुन्ह्यांच्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणातील अटक आरोपींचा इतर अनेक गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, याच संशयितांविरोधात यापूर्वी तक्रारी दाखल झाल्या असताना वेळेवर प्रभावी कारवाई का झाली नाही? सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर आणि काशीळ परिसरातील २२ शेतकऱ्यांच्या मोटारपंपाच्या केबल चोरीचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला. मात्र या तपासाला एवढी गती कशी मिळाली, याबाबत आता गावोगावी चर्चा सुरू झाली आहे. वाचा सविस्तर...
22 Jun 2026 04:22 PM (IST)
भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच हॉकी महिला नेशन्स कप २०२५-२६ ( FIH Nations Cup 2026) जिंकून इतिहास रचला आहे. रविवारी (दि. २१ जून) ऑकलंड येथे झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडचा २-० असा पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि प्रतिस्पर्धी संघाला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. या दमदार आणि ऐतिहासिक कामगिरीनंतर हॉकी इंडियाने संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी भरघोस बक्षीस रकमेची घोषणा केली. वाचा सविस्तर...
22 Jun 2026 04:07 PM (IST)
NEET UG 2026: डॉक्टर बनण्याचे स्वप्न घेऊन विद्यार्थी नीट परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्राजवळ पोहचतात. परंतु काही वेळा अवघ्या काही मिनटाच्या उशीराने त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळत नाही. त्यावेळी त्यांना स्वप्न भंगल्यासारखे वाटते. अगदी अशीच परिस्थिती जेव्हा री-नीट परीक्षेच्या दिवशी एक मुलगी अवघ्या काही मिनिटांच्या विलंबाने परीक्षा केंद्रावर पोहोचली, तेव्हा तिच्यासोबत आलेल्या वडिलांचे जग जणू तिथेच थांबले. केंद्राबाहेर ते कधी हात जोडून अधिकाऱ्यांकडे गयावया करत होते की ‘माझ्या मुलीला परीक्षा देऊ द्या.’ नीट फेरपरीक्षेसाठी उशिरा पोहोचल्यामुळे या विद्यार्थिनीला आत प्रवेश मिळू शकला नाही. वाचा सविस्तर...
22 Jun 2026 03:50 PM (IST)
IPL 2027: यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सला स्पर्धेबाहेर जावे लागले होते. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ सपशेल अपयशी ठरला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने 2027 च्या आयपीएल हंगामासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. 2027 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात फार मोठे बदल दिसून येऊ शकतात. मात्र हार्दिक पंड्याचा पत्ता कट होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. वाचा सविस्तर
22 Jun 2026 03:45 PM (IST)
फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World Cup 2026) दरम्यान, इराणच्या फुटबॉल संघाने एक अशी कामगिरी केली आहे, जिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोमवार, २१ जून रोजी बेल्जियमविरुद्ध सामना 0-0 ने ड्रॉ राहिल्यानंतर, इराणी खेळाडूंनी लॉस एंजेलिसमधील सोफी स्टेडियमला भावनिक निरोप दिला. यावेळी त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये एक नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये अनेक चाहत्यांचे आभार मानले तसेच जगाला शांततेचा संदेश देण्यात आला. ही नोट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. वाचा सविस्तर
22 Jun 2026 03:40 PM (IST)
चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध प्रवासी सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC), स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केल्यानंतर राज्यभरासह चंद्रपूर जिल्ह्यातही एनसीएमसी कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला. परिणामी जिल्ह्यातील एसटी आगारांमध्ये कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. वाचा सविस्तर
22 Jun 2026 03:35 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीत महिलाकेंद्रित आणि भावनिक कथांचा ट्रेंड दिवसेंदिवस बळकट होताना दिसत आहे. अशातच एका आईच्या प्रेमाची, वेदनेची आणि न्यायासाठीच्या संघर्षाची कथा सांगणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने सोशल मीडियावर उत्सुकता वाढवली असून, एका सामान्य आईच्या असामान्य लढ्याची झलक प्रेक्षकांना भावत आहे. वाचा सविस्तर
22 Jun 2026 03:30 PM (IST)
NEET UG 2026 Lakhisarai Cheating Case : काल झालेल्या नीट यूजी (NEET UG) फेरपरीक्षेदरम्यान बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातून कॉपी आणि दुसऱ्याच्या जागी परीक्षा देण्यासारखी काही प्रकरणे समोर आली आहेत. यावर राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, काही उमेदवार परीक्षा केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, तर काही जण इतर उमेदवारांच्या जागी परीक्षा देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, संस्थेची सतर्कता आणि कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे हे प्रयत्न वेळेतच हाणून पाडण्यात आले. वाचा सविस्तर
22 Jun 2026 03:25 PM (IST)
India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये भारत-अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी सुरू झाल्यानंतर, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेम्सन ग्रीअर या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि इतर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. नेमकं यांच्यातील करारामध्ये काय आहे? काय आलीय ही अपडेट सविस्तर जाणून घेऊयात.
22 Jun 2026 03:20 PM (IST)
China DF 17 hypersonic missile video : जागतिक महासत्ता बनण्याच्या शर्यतीत असलेल्या चीनने (China) आंतरराष्ट्रीय संरक्षण क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. चीनची अधिकृत सरकारी वाहिनी ‘सीसीटीव्ही’ने (CCTV) आपल्या सर्वात शक्तिशाली आणि आतापर्यंत अत्यंत गुप्त ठेवलेल्या ‘डोंगफेंग-१७’ म्हणजेच ‘डीएफ-१७’ (DF-17) हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या थेट प्रक्षेपणाचा व्हिडिओ पहिल्यांदाच सार्वजनिक केला आहे. संरक्षण वर्तुळात ‘कॅरियर किलर’ (Carrier Killer) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घातक शस्त्राचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अमेरिका, तैवान आणि युरोपीय देशांच्या संरक्षण तज्ञांमध्ये तातडीने चर्चा सुरू झाली आहे. चिनी रॉकेट फोर्सच्या ६० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या फुटेजमध्ये गोबी वाळवंटातून (Gobi Desert) झालेले हे क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण दाखवण्यात आले आहे. वाचा सविस्तर
More DF17 launches and a better look at the RV.
Interestingly they released the very first launch of these specific TELs which suggests the footage is quite old as expected from plarf. https://t.co/enBA7BavS2 pic.twitter.com/zdHutW75Yz
— Hûrin (@Hurin92) June 20, 2026
22 Jun 2026 03:15 PM (IST)
आंध्रप्रदेश: आंध्र प्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या ३८ वर्षीय पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीनेच हत्या केल्याचे समोर आले आहे. हृदयविकाराचा बनाव करण्यात आला होता मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यात आला आहे. तीला आधीच हृदयाचा आजार असल्यामुळे त्यांच्या या डावावर सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही. मग या प्रकरणाचा कसा उलगडा झाला? जाणून घ्या…
22 Jun 2026 03:10 PM (IST)
MLC Election Result 2026 : विधान परिषद निवडणुकांच्या निकालाने राज्यभरात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. विधानपरिषदेच्या 17 पैकी 11 निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले असून 17 पैकी तब्बल 16 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत सुमार राहिली असून फक्त एका जागेवर यश मिळवता आले आहे. या निवडणुकीतला महाविकास आघाडीचा हा सर्वात वाईट पराभव मानला जात असून कुणाला 5 मते तर कुणाला चक्क शून्य मते पडली आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुमार कामगिरी केली आहेच पण राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलादेखील अत्यंत निराशाजनक कामगिरी करवून अपयशाला सामोरे जावे लागले आहे. वाचा सविस्तर
22 Jun 2026 03:05 PM (IST)
Keir Starmer Resignation News in Marathi : लंडन : अखेर ब्रिटनचे पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे कीर स्टार्मर यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी (२२ जून) रोजी त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. पक्षातील खासदारांकडूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. सध्या त्यांच्या राजीनामा देण्याने ब्रिटिश सरकार आणि लेबर पार्टीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
22 Jun 2026 02:59 PM (IST)
शेतकऱ्यांसाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण आजच्या स्थितीला वजा 25 टक्क्यामध्ये गेलेल आहे. उजनीत सध्या एकूण पाणी साठवण क्षमतेच्या वजा 49 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पश्चिम घाट माथ्यावर पावसानं ओढ दिली आहे. त्यामुळे उजनी वर अवलंबून असलेल्या पुणे जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.
22 Jun 2026 02:50 PM (IST)
ओम राजेनिंबाळकर यांचा निर्णय काल झाला आहे. त्यांनी काल जाहीर केलं आहे. अगोदर कोणाचीही नाव विनाकारण बदनाम करण्याचा आमचा इरादा नाही. ओम राजेनिंबाळकर यांच्यामुळे महाविकास आघाडीची मत फुटल्याची चर्चा भाजप आमदार सुरेश धस यांनी फेटाळली. महाविकास आघाडीची मत का फुटली हे मविआला विचारा, असं आमदार धस यांनी म्हटलं.
22 Jun 2026 02:42 PM (IST)
पालघरमध्ये स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात शिंदे शिवसेना आक्रमक झाली असून, आंदोलन करत शिवसैनिकांनी महावितरणच्या पालघर मंडळ कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी महावितरणविरोधात घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर योजना तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना अवाजवी वीज बिले येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच स्मार्ट मीटरची सक्ती सुरूच ठेवल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. सत्तेत असलो तरी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढत राहू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी यावेळी दिला.
22 Jun 2026 02:30 PM (IST)
वाळू माफियायांच्या विरोधात आवाज उठवणारे नागझरी गावचे सरपंच नारायण शिंदे यांच्यावर वाळू माफियांनी घरात घुसून हल्ला केला. हल्ला करणाऱ्यांना अद्यापही पोलिसांनी अटक केली नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी धुळे, सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केलं. गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत आहे. याच्याच तक्रारी सरपंच नारायण शिंदे यांनी प्रशासनाला केल्या होत्या.
22 Jun 2026 02:20 PM (IST)
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी उद्या 23 जून रोजी होणार आहे. आरोपीच्या वकिलांकडून टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे. 9/12चे टोल नाक्यावरील फुटेज पाहिजे आहे. तसेच आरोपीच्या वकिलांना सीसीटीव्ही फुटेज 10 एप्रिल 2025 रोजी दिले आहे, असे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले. आरोपी न दिलेले वेगवेगळे 5 अर्ज सरकारी पक्षाने, यावर म्हणणे मांडले आहे. वेगवेगळे अर्ज करून प्रकरण पुढे ढकलले जात आहे. कलम 10 चा संदर्भ देत मकोका मधील प्रकरण हे प्राधान्याने चालवले जावे, अशी सरकारी पक्षाच्या वतीने मागणी. जयराम चाटे या आरोपीच्या जामीन अर्जावर उद्या न्यायालयात युक्तिवाद होणार आहे.
22 Jun 2026 02:11 PM (IST)
नाशिकच्या मनमाड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी खुनाच्या घटना सकाळी उघडीस आल्याने खळबळ उडाली आहे. मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर-पुणे महामार्गावरीव ललवाणी पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड टाकून एका व्यक्तीची खून केला, तर दुसरी घटना याच महामार्गावरील अन्य एका ठिकाणी घडली. ज्यांचे मर्डर झाले ते बांधकाम मजूर असल्याची प्राथमिक माहिती असून, दिवसभर काम करुन ते रात्री कुठेतरी आश्रयाला थांबत असतात. या दरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात असून पोलिस याचा अधिक तपास करीत आहे.
22 Jun 2026 02:00 PM (IST)
दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या नीट (NEET) परीक्षेत देशभरातील लाखो विद्यार्थी भाग घेतात मात्र, यश काही मोजक्याच उमेदवारांना मिळते. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणे सोपे आहे, पण ते पूर्ण करणे तितके सोपे नसते. अशा परिस्थितीत तीच लोक ध्येयापर्यंत पोहोचू शकतात, जी कठीण परिस्थितीमध्येही हिंमत हारत नाहीत आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने संघर्ष करत राहतात. असेच एक उदाहरण बिहारचे राहणारे शिव कुमार आहेत, ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि असे काही करून दाखवले ज्याचा कोणी विचारही करू शकत नव्हता.
22 Jun 2026 01:55 PM (IST)
राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या असून, दररोज अपघातामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पैठण तालुक्यातील विहामांडवा-चौंडाळा मार्गावरील सहकारी साखर रेणुकादेवी-शरद कारखान्यासमोर रविवारी (२१ जून) रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पारधी कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
22 Jun 2026 01:45 PM (IST)
विधानपरिषदेच्या उस्मानाबाद–लातूर–बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. सोमवारी २२ जून रोजी झालेल्या मतमोजणीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार महेश माणिकराव देशमुख यांचा तब्बल ७१९ मतांनी पराभव केला. अंतिम निकालानुसार बसवराज पाटील यांना ८४४ मते, तर महेश देशमुख यांना १२५ मते मिळाली. त्यामुळे भाजपने हा मतदारसंघ मोठ्या फरकाने आपल्या ताब्यात कायम राखला आहे.
22 Jun 2026 01:35 PM (IST)
सध्या सगळ्यांवर फिफाचा ज्वर चढला आहे. भारतही याला अपवाद नाही. भारतामध्येही फुटबॉल फिव्हर वाढत चालला आहे. दरम्यान अनेकांची आवडती टीम ही अर्जेंटिना आणि पोर्तुगाल आहे. कारण रोनाल्डो आणि मेस्सीचे जगभरात अनेक चाहते आहेत. मात्र असे असातनाही फिफा विश्वचषक २०२६ मध्ये मोरोक्कोने इतिहासाच्या सुवर्ण पानांवर आपले नाव कोरले आहे. ३९ सामन्यांमध्ये अपराजित राहून, त्यांनी इटलीची ३७ सामन्यांची आणि अर्जेंटिनाची ३६ सामन्यांची विजयी मालिका मागे टाकली आहे. चार वर्षांपूर्वी, उपांत्य फेरी गाठून मोरोक्कोने मोठ्या संघांना आव्हान देण्याची आपली तयारी दर्शवली होती. यामुळे आता मोरक्कोची टीम भक्कम खेळाडू असल्याचे मानले जात आहे.
22 Jun 2026 01:25 PM (IST)
विधान परिषदेच्या १७ जागांचे निकाल हाती आला आहेत. या १७ जागांवर झालेल्या निवडणूक सर्वात चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे नाशिक मतदार संघ. शिंदेंचा दाणून पराभव झालेला आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळे गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा पराभव केला आहे.
22 Jun 2026 01:25 PM (IST)
देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली नीट परीक्षा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (मेडिकल कॉलेज) प्रवेश घेण्यासाठी आयोजित केली जाते. यावर्षी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा २१ जून २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत पुन्हा आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान, तेलंगणातील हैदराबादमधून एका विद्यार्थ्याने नक्कल (कॉपी) करण्यासाठी लढवलेली एक अजब शक्कल समोर आली आहे. तेलंगणाच्या हैदराबादमध्ये नीट फेरपरीक्षेत बसलेल्या एका १८ वर्षीय उमेदवाराने कॉपी करण्याचा प्रयत्न केला, ज्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्राच्या वॉशरुममधील फ्लश टँकमध्ये आपला फोन लपवून ठेवल्याचा आणि तो काढून फोनमधून प्रश्नांची उत्तरे पाहून कॉपी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या उमेदवारावर आहे.
22 Jun 2026 01:15 PM (IST)
ओटीटी विश्वात प्रेमकथांचा वेगळा ट्रेंड पाहायला मिळत असताना ZEE5 मराठी प्रेक्षकांसाठी एक नवी आणि वास्तवाशी जवळीक साधणारी प्रेमकथा घेऊन येत आहे. ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या ओरिजिनल वेब सीरिजची घोषणा करण्यात आली असून, ही मालिका प्रेम, करिअर, महत्त्वाकांक्षा आणि आत्मसन्मान यांच्या गुंतागुंतीच्या नात्यांचा वेध घेणार आहे. अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय प्रमुख भूमिकेत झळकणार असून या सीरिजचे दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केले आहे.
22 Jun 2026 01:05 PM (IST)
एक मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात एप्रिल २०२६ पर्यंत मोठी कारवाई करण्यात आली असून, १०७ खत विक्री परवाने निलंबित, ६ परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच ७ विक्री केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली.
22 Jun 2026 01:02 PM (IST)
तांत्रिक तपास, टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तुळजापूर व सोलापूर येथून चोरीस गेलेल्या दोन स्विफ्ट डिझायर कारांचा छडा लावत पोलिसांनी एका सराईत कारचोराला अटक केली आहे. तेलंगणातील निजामाबाद येथून दोन्ही कार जप्त करण्यात आल्या असून, आरोपीला तुळजापूर पोलिसांनी अटक करून पुढील चौकशी सुरु केली आहे.
22 Jun 2026 12:48 PM (IST)
एकीकडे पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे घरफोड्या करणाऱ्या एका कुविख्यात गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये मध्यरात्री थरार घडला आहे. पोलिस पथकाने सापळा लावून त्याला पकडल्यानंतर त्याने हातातील चाकूने पोलिस अधिकाऱ्यावर वार केले आहेत. छातीवर एक वार झाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली. गोळी गुन्हेगाराच्या मांडीला लागली आणि तो जखमी झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश रायकर असे गुन्हेगाराच्या हल्यात जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात सराईत गुन्हेगार करणसिंग राजपुतसिंग दुधानी (वय २९, रा. रामटेकडी) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. करणसिंग दुधानी हा गोळीबारात जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
22 Jun 2026 12:36 PM (IST)
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी ७० टक्के जमिनीच्या भूसंपादनास संमती मिळाल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला असला, तरी या आकडेवारीवर विमानतळविरोधी शेतकऱ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शासनाने सुमारे २१०० एकर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाल्याचे सांगितले असताना प्रत्यक्षात केवळ १००० कोटी रुपयांचेच वितरण झाले असल्याचे निदर्शनास आणून देत हा आकडा खरा की खोटा, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. "शासनाने ७० टक्के संमती मिळाल्याचा दावा केला असेल, तर विमानतळासंदर्भातील निविदा अद्याप का काढण्यात आलेली नाही?" असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी ५० टक्के भूसंपादन झाल्यावर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले होते. मग 70 टक्के संमती मिळालेली असताना ५०% भूसंपादन करून निविदा का काढण्यात आली नाही असा सवाल स्थानिक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. संमती दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्याच दिवशी मोबदला जमा केला जाईल, अशी ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र त्याबाबत पुढे काय झाले, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदल्याची रक्कम जमा झाल्यानंतर ती खाती 'होल्ड' करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
22 Jun 2026 12:24 PM (IST)
बॅंकॉकहून पुण्यात विमानाद्वारे आलेल्या एका बेवारस बॅगेत तब्बल साडे एक्केवीस किलो हायड्रोपोनिक गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत तब्बल अडीच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा हात असल्याचे सांगितले जात असून, विमानतळावर सीमाशुल्क (कस्टम) विभागाने मोठी कारवाई करत हा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे.
22 Jun 2026 12:12 PM (IST)
हांडेवाडीतील तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा पोलिसांनी दोन तासात लावला आहे. खून करुन पसार झालेल्या एकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. आकाश मारुती झांबरे (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आकाश उर्फ आत्या अशोक भरेकर (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत झांबरे याचा चुलतभाऊ रवींद्र जालिंदर झांबरे यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
22 Jun 2026 11:55 AM (IST)
भाजपचे दिग्गज नेते आणि अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांनी विरोधकांना चारीमुंड्या चित करत तब्बल ७१९ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवून दणदणीत विजय साकारला आहे. त्यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख यांचा अत्यंत दारुण पराभव केला असून, निकाल जाहीर होताच धाराशिव शहरातून भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवाराची ढोल-ताशांच्या गजरात भव्य विजयी मिरवणूक काढली आहे.
22 Jun 2026 11:50 AM (IST)
भंडारा गोंदिया प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर विजयी झाले आहेत. त्यांना 302 मध्ये मिळाली तर महाविकास आघाडी समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 154 मते मिळाली. मतदार संघामध्ये एकूण 457 मतदार नोंदणी झाली होती. निवडणुकीत 100 टक्के मतदान झाले. यात एक मत अवैध पडले. 148 मतांनी महायुतीचे ब्राह्मणकर विजयी झाले.
22 Jun 2026 11:40 AM (IST)
सोलापूरः विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत (भाजप) यांनी विजय मिळवला. राऊत यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख यांचा ३६५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत १३ मते बाद ठरली. वसंत देशमुख यांना ११८ मते मिळाली.
22 Jun 2026 11:35 AM (IST)
काँग्रेसची स्वतःची 170 मते होती आणि महाविकास आघाडीची एकूण 211 मते असतानाही अतुल लोंढे यांना फक्त 130 मते मिळाली. याचाच अर्थ काँग्रेसच्या किमान 40 नगरसेवकांनी आणि महाविकास आघाडीच्या इतर मित्रपक्षांच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला साथ दिली. पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, भाजपने प्रत्येकी 10 लाख रुपये देऊन 100 मतदारांची 'क्रॉस वोटिंग' करून घेतली.
22 Jun 2026 11:30 AM (IST)
राज्याचं लक्ष लागलेल्या सांगली सातारा विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला असून भाजपच्या धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मोठा पराभव केला आहे. धैर्यशील कदम यांनी 593 मतं मिळवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केला. अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली आहेत.
22 Jun 2026 11:21 AM (IST)
गोकुळ गीते यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बोलावून घेतले आहे. गोकुळ गीते यांना आज सायंकाळी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान एकनाथ शिंदेंनी मुंबईत बोलावले आहे. तसेच गोकुळ गीते यांच्यासाठी एकनाथ शिंदे विमान देखील पाठवणार आहेत.
22 Jun 2026 11:12 AM (IST)
नाशिक विधान परिषदेसाठी एकूण 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीदरम्यान यातील 13 मते अवैध ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण 605 मते वैध ठरली. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. या मतमोजणीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी तब्बल 357 मते मिळवत विजयाचा टप्पा सहज पार केला. पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी 303 चा कोटा पार केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला.
22 Jun 2026 11:08 AM (IST)
नांदेड:अमर राजूरकर 339, कृष्णा पाटील आष्टीकर 84 लातूर बीड धाराशिव: बसवराज पाटील 845 महेश देशमुख 124 परभणी हिंगोली: सईद खान 242, डॉ. विवेक नावंदर -० जालना छत्रपती संभाजीनगर: सुहास शिरसाट 454, गणेश लोखंडे 124
22 Jun 2026 11:06 AM (IST)
लातूर बीड धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजप महायुतीच्या बसवराज पाटील यांचा विक्रमी मतांनी विजय