CJP Core Panel Meeting: सीजेपी कोर पॅनेलची ५ ऑगस्टला बैठक (Photo Credit- X)
सीजेपीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या राज्यांतील समर्थक आणि तरुणांकडून मिळालेल्या फीडबॅकच्या (Feedback) आधारे भविष्यातील धोरण आखण्यासाठी अभिजीत दीपके यांनी आपल्या निवासस्थानी सदस्यांची बैठक बोलावली आहे. NEET पेपर लीक प्रकरणातील सफल आंदोलनानंतर सीजेपीकडून तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ५ ऑगस्टच्या बैठकीनंतर दीपके स्वतः पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील निष्कर्षांची माहिती देतील.
दिल्लीतील आंदोलन संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, दिपके यांनी CJP चळवळ ही विद्यार्थी आणि तरुणांशी संबंधित मुद्दे मांडण्यासाठी समर्पित एक “प्रतिसाद गट” (response group) म्हणून सुरू ठेवण्याचे संकेत दिले होते. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गांवर आपला विश्वास असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करत, दिपके यांनी अलीकडच्या काळात स्पष्ट केले आहे की, CJP कोणत्याही राजकीय पक्षाला सरकारवर टीका करण्यासाठी आपल्या व्यासपीठाचा वापर करू देणार नाही किंवा स्वतः कोणत्याही राजकीय संघटनेत सामील होणार नाही.
निरीक्षकांच्या मते, दिपके आणि CJP यांच्यासमोरील नवीन आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांच्या रास्त तक्रारींवर आधारित आंदोलने टिकवून ठेवणे आणि त्याच वेळी शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी काम करणे. CJP चळवळीला खतपाणी घालण्यात बाह्य शक्तींचा सहभाग असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, तज्ञांचे असे मत आहे की जिथे जनअसंतोष अस्तित्वात नाही तिथे अशा शक्ती तो निर्माण करू शकत नाहीत; मात्र, विशिष्ट परिस्थितीत त्या विद्यमान तक्रारींची तीव्रता वाढवू शकतात आणि लोकांना संघटित करण्याची प्रक्रिया वेगवान करू शकतात.
जनसहभागाची व्याप्ती आणि वेग, CJP ची सोशल मीडियावरील मोठी पोहोच, तरुणांचा लक्षणीय सहभाग आणि चळवळीचा सातत्यपूर्ण वेग यामुळे अनेक वर्तुळांमध्ये असा प्रश्न उपस्थित होत आहे की, हे केवळ एका स्थानिक आंदोलनापेक्षा काहीतरी खूप मोठे आहे का? एका विश्लेषकाने नमूद केले की, जरी प्रश्नपत्रिका फुटण्याच्या विरोधात अलीकडे सुरू झालेल्या आंदोलनाला कारणीभूत ठरलेल्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असले, तरी या आंदोलनाचा विस्तार ज्या प्रकारे झाला, त्यावरून गेल्या दोन दशकांत जगभरातील निदर्शनांमध्ये दिसून येणाऱ्या एका विशिष्ट पद्धतीचे प्रतिबिंब उमटलेले दिसते.






