Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 08.09.2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गुजरात दौऱ्यावर असून, मुंबईतील ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ चे उद्घाटन करणार आहेत.नेपाळ आणि तिबेट सीमेवरील प्रलयंकारी महापुरात मृतांचा आकडा १,३५५ च्या पार गेला असून सुमारे ४,९९६ लोक अजूनही बेपत्ता आहेत.
ईशान्य भारत आणि उत्तर भारतातील काही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे किनारपट्टीच्या भागांना पुन्हा एकदा खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरणीचा कल दिसून येत आहे.
08 Sep 2026 10:20 AM (IST)
8th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर मूळ पगारात (Basic Salary) नेमकी किती वाढ होणार, याकडे लाखो कर्मचाऱ्यांचे आणि निवृत्तीधारकांचे लक्ष लागले आहे. या पगारवाढीत 'फिटमेंट फॅक्टर' नेमका किती असणार, हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.
सातव्या वेतन आयोगादरम्यान २.५७ इतका फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. याच धर्तीवर आठव्या वेतन आयोगातही २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते. मात्र, २.५७ हा सध्या केवळ एक गृहीत धरलेला आकडा असून, अंतिम फिटमेंट फॅक्टर अद्याप निश्चित झालेला नाही.
08 Sep 2026 10:10 AM (IST)
Water Crisis : अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील दुष्काळाचे संकट अधिक गडद होत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी जायकवाडी धरण वगळता, या भागातील प्रमुख आणि लहान धरणांमधील सर्व पाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यावर्षी रब्बी पिकांसाठी धरणांमधून नियोजित पाणी सोडण्यात येणार नाही.
08 Sep 2026 10:00 AM (IST)
Pradhan Mantri Awas Yojana: शहरांमध्ये वाढणाऱ्या घरांच्या किमतींमुळे स्वतःचे घर खरेदी करणे सामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी कठीण झाले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारने 'प्रधानमंत्री आवास योजना-शहरी २.०' अंतर्गत 'अफोर्डेबल रेंटल हाउसिंग' (ARH) योजना सुरू केली आहे.
या योजनेद्वारे शहरात रोजगारासाठी येणाऱ्या श्रमिकांना, कामगारांना आणि मध्यमवर्गीयांना अत्यंत कमी खर्चात आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त भाड्याची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वाढत्या शहरीकरणात सामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे.
08 Sep 2026 09:55 AM (IST)
Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नेमके कधी जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्याच्या वितरणाबाबत अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळात हिरवा कंदील मिळताच निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
08 Sep 2026 09:42 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 8 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,414 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,129 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,560 रुपये आहे. भारतात 8 सप्टेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,41,290 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,54,140 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,600 रुपये आहे. भारतात 8 सप्टेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 249.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,49,900 रुपये आहे.
08 Sep 2026 09:42 AM (IST)
नागपूर : सिव्हिल लाईन्ससारख्या सुरक्षित परिसरात पूर्व वैमनस्यातून गुन्हेगाराची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री आरोपींनी आकाश ऊर्फ डुंबक सुरेश नेवारे (वय २५, रा. तेलंगखेडी, गोंडटोली) याला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर त्याला दारू पाजली. तो मद्यधुंद झाल्यानंतर शस्त्रांनी हल्ला केला. तब्बल २४ वार झाल्याने आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.






