Maharashtra Breaking News
03 Dec 2025 09:15 AM (IST)
बुलढाणा : बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मदत केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली.बोगस मतदाराशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. तपासानंतर दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरु आहे.
03 Dec 2025 09:10 AM (IST)
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी तणाव आणि धक्कादायक घटना समोर आल्या. चंद्रपूरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने भाजप कार्यकर्त्याला मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना उघड झाली असून, गडचांदूर येथे एका मतदाराने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याचा प्रकार घडला.
राजुरा शहरात 2 डिसेंबरच्या संध्याकाळी या घटना घडल्या. राजुरा नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र डोहे यांनी भाजप कार्यकर्ता गजानन कुलकर्णी यांना निवडणुकीत मदत न केल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे समोर आले. घटनेनंतर संतप्त भाजप आणि व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडत कारवाईची मागणी केली.यावेळी भाजप आमदार देवराव भोंगळे देखील पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते. पोलिसांनी प्रकरणात तपास सुरू केला असून, घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
03 Dec 2025 09:05 AM (IST)
नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा करातून (GST) 1.70 लाख कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. गतवर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये 1.69 लाख कोटी रुपयांचे कलेक्शन झाले होते. यंदा वार्षिक पातळीवर कलेक्शनमध्ये वाढ झाली असली तरी ऑक्टोबर 2025 च्या तुलनेत महसूल घटल्याचे स्पष्ट झाले आहे.
GST दरातील बदल 22 सप्टेंबरपासून लागू झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये दसरा-दिवाळीच्या खरेदीमुळे सरकारला तब्बल 1.96 लाख कोटी रुपयांची वसुली झाली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये खरेदी कमी झाल्याने कलेक्शन कमी होऊन 1.70 लाख कोटींवर आला.नोव्हेंबरमध्ये सकल कर महसूल 2.3 टक्क्यांनी कमी होऊन 1,24,299 कोटी रुपये झाला. यामध्ये सीजीएसटी 34,843 कोटी, राज्यांचा जीएसटी 42,522 कोटी आणि आयजीएसटी 46,934 कोटी रुपये असा समावेश आहे.
03 Dec 2025 08:57 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट आयएएस अधिकारी कल्पना भागवत (Fake IAS Officer Kalpana Bhagwat) प्रकरणात आणखी गंभीर खुलासे झाले आहेत.नवीन तपशीलांनुसार, कल्पना भागवतने स्वतःला वरिष्ठ आयएएस अधिकारी म्हणून दाखवून, पद्मश्री पुरस्कार मिळवून देण्याचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली आणि अहिल्यानगर येथील अनेक नेत्यांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. याच प्रकरणात, तिने संबंधित व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप करण्यात येत असून, हा आर्थिक घोटाळा किती मोठा आहे याचा ताळेबंद पोलिसांकडून तपासला जात आहे.
03 Dec 2025 08:48 AM (IST)
देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. चैत्यभूमी येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
03 Dec 2025 08:47 AM (IST)
राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेळ्या भागात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करुन तिघांनी एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना कात्रज भागात घडली आहे. या प्रकारानंतर आरोपींनी दहशत माजवून ट्रकची काचदेखील फोडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापठ पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २६ वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Marathi Breaking news live updates- बिहार विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर आता पश्चिम बंगालसह इतर पाच राज्यांत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, भाजपकडून तयारीही केली जात आहे. या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे असेल, असे सांगण्यात येत आहे. गृहमंत्री शहा या महिन्याच्या अखेरीस पश्चिम बंगालच्या दौऱ्याने त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करतील, अशीही माहिती दिली जात आहे.






