मुंबई– राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट (Shinde Vs Thackeray) अनेकवेळा आमनेसामने आला आहे. एकिकडे पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह या दोन्हीसाठी यांची न्यायालयीन (court) लढाई सुरु आहे. तर दुसरीकेड अधूनमधून हे दोन्ही गट कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन ऐकमेकांत भिडले जाताहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) भिडले आहेत. आम्हाला वारंवार राजीनामा द्या असं राऊत म्हणताहेत. त्याऐवजी स्वत: राऊतांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी मंत्री दीपक केसरकरांनी केली आहे.
…तर त्यांनी राजीनामा द्यावा
दरम्यान, आमच्या मतावर निवडून राज्यभेत गेलेले आहेत, थोडी जरी त्यांना नैतिकतेची जाणीव असेल, तर आम्हाला आव्हान देण्याऐवजी त्यांनी राज्यसभेच्या आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं. छोटीशीच तर निवडणूक असते, फक्त आमदाराच मतदान करणार आहेत, तेवढा तरी एकदा त्यांनी प्रयोग करून बघावा. असं खुलं आव्हान केसरकरांनी राऊतांना दिलं आहे.
आमचाच विजय होईल…
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत किती मतदान झाले हे पाहिलं जातं. किती सदस्य निवडून आले हे पाहिलं जातं. आमच्यासोबत ऐंशी ते नव्वद टक्के आमदार आणि खासदार आहेत. त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल. आमचाच विजय होईल, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. पक्षाचं चिन्हं आपल्याच गटाला मिळणार असल्याचा दावाही केला. पक्ष चिन्हावर आमचाच हक्क आहे. त्यामुळे गुलाल उधळणार की नाही हा भाग नाहीये. नेत्यांना किती मतदान मिळाले हे निवडणूक आयोग पाहतो.
त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली
संजय राऊत यांनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या विचारापासून लांब नेलंय. त्यांनी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलाय, असा दावाही केसरकरांनी केला आहे. दरम्यान, बाळासाहेबांच्या विचारापासून सर्व शिवसैनिकांना दूर नेण्याचा मोठा वाटा संजय राऊतांचा आहे. मुळात राऊत हे शिवसेनेचे नाही ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. कारण ते नेहमी राष्ट्रवादीचे गुणगान गात असतात. त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली हे आम्हाला नेहमीच वाटतंय. अशी टिका देखील केसरकरांनी राऊतांवर केली.