मुंबई- शिवसेनेमधून (Shivsena) शिंदे गटाने (Shinde Group) बंड करत राज्यात भाजपासोबत (BJP) सरकार स्थापन केले. शिंदे गटातील १६ आमदार अपात्र असल्याचं म्हणत शिवसेनेनं न्यायालयाचे (Court) दरवाजे ठोठावले आहेत. या प्रकरणावर १४ फेब्रुवारीला सुनावणी पार पडणार आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाने पक्ष व चिन्हावर दावा केल्यानं निवडणूक आयोगाने चिन्ह गोठावले आहे. हा वाद निवडणूक आयोगात सुरु आहे, दरम्यान, यावर उद्या सुनावणी होणार आहे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाणाचे चिन्ह कुणाला मिळणार याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच घेण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजे (सोमवारी ३० जानेवारी) रोजी केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत अंतिम सुनावणी होणार असून, याच दिवशी अथवा याच आठवड्यात याबाबतचा निर्णय जाहीर होणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान, राज्यात ७ महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरापासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या लढाई सुरु आहे. ही लढाई कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. याआधी २० जानेवारी रोजी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना २३ जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते. तसेच याबाबतची पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी घेण्याचे निश्चित केले होते. विशेष म्हणजे २३ जानेवारी याच दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुखपदाचा उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती.
दुसरीकडे बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आपणच असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीतच सध्याचे वातावरण, अनेक नेत्यांची देहबोली आणि अतिआत्मविश्वास पाहता लोकप्रतिनिधी असलेले आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्ते यांच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा दावा शिंदे गटातील काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. ठाकरे गटातील नेत्यांमध्ये मात्र शिंदे गटातील नेत्यांप्रमाणे असा उत्साह पाहायला मिळत नाही. याउलट अनेक जण निवडणूक आयोगाचा निकाल आपल्याविरोधात गेल्यास यासाठी आपला ‘प्लॅन बी’ काय असेल, यावर भर देत असल्याचे चित्र आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला न मिळाल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई कशी देता येईल यासाठी तयारी केली जात असल्याची माहिती आहे.