
Maharashtra breaking News Marathi
17 Jan 2026 10:47 AM (IST)
भारत विरुद्ध बांगलादेश अंडर १९ विश्वचषक २०२६ चा ७ वा सामना आज म्हणजे शनिवार, १७ जानेवारी रोजी खेळला जाईल. हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित केला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होईल, तर दोन्ही कर्णधार अर्धा तास आधी म्हणजे दुपारी १२.३० वाजता टॉससाठी मैदानात उतरतील. हा सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर टीव्हीवर भारत विरुद्ध बांगलादेश अंडर १९ विश्वचषक २०२६ चा ७ वा सामना पाहू शकता. तर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग देखील तुम्ही पाहू शकता. भारत विरुद्ध बांगलादेश अंडर १९ वर्ल्ड कप २०२६ सामना ७ जिओहोस्टार अॅपवर ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.
17 Jan 2026 10:39 AM (IST)
जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी असलेल्या आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष आणि दिग्गज उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे वडील मोहन लाल मित्तल यांचे गुरुवारी लंडनमध्ये निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते आणि त्यांच्या १०० व्या वाढदिवसापासून काही महिने दूर होते. त्यांच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी प्रियजनांच्या उपस्थितीतच अखेरचा श्वास घेतला.
17 Jan 2026 10:31 AM (IST)
मागील 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता होती. पण यावर्षीच्या महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने बहुमत गाठत मुंबई महापालिका काबीज केली. काल मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकल्या. तर शिंदे सेनेला २९ जागा मिळाल्या. पण त्याचवेळी ठाकरे गटाला ६५ जागांवर समाधान मानावे लागले. तर मनसेचा केवळ ६ जागांवर विजय झाला. या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
17 Jan 2026 10:23 AM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरू व्हायला काही तास शिल्लक आहेत, या सामन्याचे आयोजन 18 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी आहे. मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना हा दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. कारण जो संघ हा सामना जिंकेल त्याच्या हाती मालिका लागणार आहे. शुभमन गिल हा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा भगवान शिवाचे आशीर्वाद घेतले आहेत.
17 Jan 2026 10:15 AM (IST)
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Oppo A6c स्मार्टफोन चीनमध्ये एकाच स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या सिंगल व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 799 म्हणजेच सुमारे 11 हजार रुपये आहे. हा स्मार्टफोन ऑर्किड पर्पल आणि ऑलिव ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असून Oppo ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी केला जाऊ शकतो.
17 Jan 2026 10:07 AM (IST)
आयपीएल सामने स्टेडियममधून बाहेर नेले जाऊ नयेत म्हणून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज ३०० ते ३५० कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि ४.५० कोटी रुपयांचा संपूर्ण खर्च उचलण्याचीही ऑफर दिली आहे. आरसीबीने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला अधिकृत पत्राद्वारे हा प्रस्ताव दिला आहे. गेल्या वर्षी आरसीबीच्या आयपीएल ट्रॉफी विजेत्या समारंभात स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू झाल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियममधील सर्व क्रिकेट क्रियाकलाप थांबवण्यात आले होते.
17 Jan 2026 09:59 AM (IST)
India vs Bangladesh U19 : भारतीय अंडर 19 चा आज दुसरा सामना बांग्लादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने पहिला सामना यूएसविरुद्ध डिएलएस पद्धतीने जिंकला होता. तर आता दुसरा सामना हा बांग्लादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली होती. वैभव सुर्यवंशी पहिल्या सामन्यामध्ये फेल ठरला होता त्यामुळे आज त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर टिकून असणार आहे.
17 Jan 2026 09:55 AM (IST)
नागपूर : अपेक्षेप्रमाणे मनपावर चौथ्यांदा भाजपचा भगवा फडकला. २००७ पासून सलग विजयाचा झेंडा रोवणाऱ्या भाजपने काँग्रेसला पुन्हा एकदा चारीमुंड्या चित केले. भाजपचे विक्रमी जागांचे स्वप्न मात्र भंगले. शहरात एमआयएमची एंट्री तसेच मुस्लिम लीगचे मनपात रिएंट्री लक्षवेधी ठरली. बसपाचा रथ रोखला गेला. काँग्रेस गेल्यावेळच्या तुलनेत ‘किंचित’शी वाढली.
17 Jan 2026 09:50 AM (IST)
तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर आहात का? तुम्ही देखील गेल्या अनेक दिवसांपासून गेमिंगच्या नवीन अपडेटची वाट बघत आहात का? मग आता तुमची प्रतिक्षा संपली आहे. कारण गेमिंग कंपनी गरेनाने प्लेअर्ससाठी एक नवीन अपडेट जारी केलं आहे. गरेनाने फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी OB52 अपडेट अखेर जारी केलं आहे. यासाठी डेवलपरने पॉपुलर जॅपनीज एनीमे सीरीज Jujutsu Kaisen (JJK) सोबत हातमिळवणी केली आहे. याचा अर्थ असा आहे की, गेममध्ये पॉपुलर सीरीज संबंधित कॅरेक्टर्स आणि थीम-आइटम मिळणार आहेत, ज्यांचा वापर मॅच दरम्यान केला जाऊ शकतो. कॅरेक्टर्स आणि थीम-आइटम्समुळे तुमचा गेमिंग अनुभव अधिक चांगला होणार आहे.
17 Jan 2026 09:40 AM (IST)
राजस्थान: राजस्थानमधील उदयपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील एका तरुणीवर फार्महाऊसमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक संशयित आरोपी ताब्यात घेतला आहे. तर इतर दोघांचा शोध सुरु आहे.
17 Jan 2026 09:35 AM (IST)
हिंदू धर्मात मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्म यांचे केंद्र असलेली ही स्थळे केवळ पूजेसाठीच नाहीत, तर अनेक रहस्येही स्वतःमध्ये दडवून ठेवतात. भारतात सूर्यदेवांना समर्पित अनेक प्राचीन आणि गूढ मंदिरे आहेत. मान्यतेनुसार, नियमितपणे सूर्यदेवांची उपासना केल्यास घरात सुख-शांती नांदते. कलियुगात सूर्यदेव हे प्रत्यक्ष दिसणारे देव मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला दररोज जल अर्पण केल्याने कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात.
17 Jan 2026 09:30 AM (IST)
WPL 2026 Points Table : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या नवव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये RCB ने गुजरात जायंट्सचा एकतर्फी ३२ धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आणखी एकदा त्याच्या गोलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केले. त्याच्या या कमालीच्या कामगिरीमुळे गुणतालिकेमध्ये पहिले स्थान राखून ठेवण्यात यश मिळाले आहे.
17 Jan 2026 09:25 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 17 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,339 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,144 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,754 रुपये आहे. भारतात 17 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,31,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,43,390 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,540 रुपये आहे. भारतात 17 जानेवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 291.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,91,900 रुपये आहे.
17 Jan 2026 09:18 AM (IST)
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची काही शहरांमध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिली. वाईट काळातून जात असलेल्या काँग्रेसने राज्यातील पाच शहरांमध्ये बहुमत मिळवत विजयी कामगिरी केली.राज्यातील ५ शहरांमध्ये आता काँग्रेसचा महापौर होणार असून राज्यात आता ३५० नगरसेवक असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा केला. महाराष्ट्रातील किमान १० महानगरपालिकांच्या सत्ता रचनेत काँग्रेसचा वाटा असेल. पक्ष लातूर, चंद्रपूर, भिवंडी (ठाणे जिल्हा), परभणी आणि कोल्हापूर येथे महापौर नियुक्त करण्याच्या स्थितीत आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये त्यांचे पुत्र अमित देशमुख पक्षाचे वर्चस्व राखण्यात यशस्वी झाले आहेत.
17 Jan 2026 09:11 AM (IST)
महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अकोल्यात हिंसक वळण पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक २ मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर अज्ञात टोळक्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे अकोट फैल परिसरात दगडफेक होऊन मोठा राडा झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयी उमेदवार शरद तुरकर यांना या हल्ल्यात बेदम मारहाण करण्यात आली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या राड्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
17 Jan 2026 09:06 AM (IST)
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र आल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. ही निवडणूक दोघांच्याही अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची बनली होती. अशा कठीण परिस्थितीत, वॉर्ड क्रमांक १९२ मधून मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी आपला विजय निश्चित केला असून, मनसेचा 'दादरचा गड' यशस्वीपणे सांभाळला आहे.
विजयानंतर यशवंत किल्लेदार यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवाजी पार्क परिसरात कार्यकर्त्यांनी मोठा विजयोत्सव साजरा केला. आपल्या विजई उमेदवाराचे स्वागत करण्यासाठी राज ठाकरे गॅलरीत आले होते. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून राज ठाकरेंनी 'फ्लाईंग किस' देत किल्लेदारांचे अभिनंदन केले, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
17 Jan 2026 08:59 AM (IST)
BMC Election 2026: मुंबईवर गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ एकछत्री अंमल गाजवणाऱ्या ठाकरे गटाला यंदाच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. निवडणुकीतील राजकीय धक्क्यातून सावरण्यापूर्वीच ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे. शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार आणि अत्यंत ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने पक्षाने एक खंबीर आणि अनुभवी नेतृत्व गमावले आहे.
शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नीला देसाई यांना तीव्र हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. राजकीय संघर्षाच्या काळात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती.
17 Jan 2026 08:55 AM (IST)
या निकालावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 'सामना' अग्रलेखातून अत्यंत जहाल शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेने या सत्तांतराला "महाराष्ट्रद्रोही स्वप्न" आणि "शिंदेंची बेइमानी" असे संबोधले आहे.
मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून मुंबईत 'अदानी'धार्जिणा महापौर बसवण्याचे भाजपचे स्वप्न शिंदेंच्या बेइमानीमुळे पूर्ण झाले, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हा विजय 'काळ्याकुट्ट शाईने' लिहिला जाईल, असेही मुखपत्रात म्हटले आहे. त्याचवेळी १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवलेल्या मुंबईचा घास बेइमानीमुळे हिरावला जात असल्याची भावना व्यक्त करत, "आम्ही हे होऊ देणार नाही," असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या १६१ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान होणार आहे. या ऐतिहासिक विजयामुळे मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात ‘विजयी जल्लोष’ साजरा केला जात आहे. भाजपने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का देत मुंबईच्या राजकारणात आपली पकड मजबूत केली आहे.
मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोठा प्रवास केला आहे. जनसंघाच्या काळापासून आणि त्यानंतर भाजपची स्थापना झाल्यापासून पक्षाने मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेची किल्ली भाजपच्या हाती येत नव्हती.