Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 22.09.2026
एशियन गेम्समध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक (४,७८८) धावांचा जागतिक विक्रम रचला असून, भारताने नेमबाजीत दोन रौप्य पदके पटकावली आहेत.मध्यपूर्वेतील हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाधवर केलेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १०४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने सवलतीच्या दरात घरगुती एलपीजी सिलिंडर मिळवण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (BAA) अनिवार्य केले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रायगड जिल्ह्यातील रोहा रेल्वे स्थानकाचा ५५ कोटी रुपये खर्चून कायापालट व हायटेक पुनर्विकास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
22 Sep 2026 09:03 AM (IST)
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि सलग २० दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. मनोज जरांगे यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांचे, नातेवाईकांचे आणि व्यावसायिक भागीदारांचे सर्व आर्थिक व्यवहार आता आयकर विभागाच्या (Income Tax) रडारवर आले आहेत. आयटी विभागाकडून आंदोलनाशी संबंधित नेते आणि त्यांच्याशी जोडलेल्या व्यक्तींच्या आयकर रिटर्न (ITR), मालमत्ता आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांची बारकाईने तपासणी केली जात आहे.
21 Sep 2026 05:59 PM (IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. सोमवारी सकाळी ते ड्युटीवर आल्यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना अचानक छातीत दुःखू लागलं व नंतर चक्कर आली. त्यांनतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
21 Sep 2026 05:45 PM (IST)
आशिया क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेट सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ आणि जपानी पुरुष क्रिकेट एका संघ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल झाला आहे. मात्र, आशियाई क्रीडापूर्वी ते जपानविरुद्ध एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत. यासाठी दोन्ही सघ सज्ज आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार, तसेच तुम्ही या सामन्याचे लाइव्ह अॅक्शन कुठे पाहू शकता, जाणून घ्या
21 Sep 2026 05:30 PM (IST)
मागील ४०-४५ दिवसापासून पावसाने खंड दिला असून पीके करपून गेली आहेत. दुष्काळ पडलेला असताना सरकार मात्र बैठका व चर्चा यात वेळ मारून नेत आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पहात आहे, असा संतप्त प्रश्न विचारून अस्मानी व सुलतानी संकटात असलेल्या बळीराजाला राज्याचे सुलतान देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, हेक्टरी १ लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
21 Sep 2026 05:15 PM (IST)
भारताने आशियाई क्रीडा २०२६ च्या ( Asian Games 2026) स्पर्धेत मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) प्रकारात आपले पहिले ऐतिहासिक पदक मिळवले आहे. ३६ वर्षीय भारतीय फायटर सुचिका तारियालने महिलांच्या पारंपरिक ६० किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले. ही लढत अत्यंत नाट्यमय ठरली. उपांत्य फेरीत सुचिकाने सिंगापूरच्या तेओ हुई हूनविरुद्ध शौर्याने झुंज दिली आणि सामना अतिरिक्त वेळेपर्यंत नेला. मात्र, पंचांनी अंतिम निर्णय सिंगापूरच्या खेळाडूच्या बाजूने दिला. निकाल ऐकल्यावर सुचिकाला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि ती भावूक होऊन रिंगमधून बाहेर पडली.
21 Sep 2026 04:57 PM (IST)
राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाची मोठी तूट आणि लांबलेल्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर संकट आलं आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची चाहूल लागली असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकांवर रोटावेटर फिरवण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार 28 सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यामुळे सरकारला काही फायदा होईल का, असा प्रश्न जयकुमार गोरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पवारांच्या अनुभवावरूनच खोचक प्रतिक्रिया दिली. ‘अशा अनुभवाने फायदा झाला असता तर राज्यात दुष्काळच पडला नसता,’ असं म्हणत गोरेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
21 Sep 2026 04:47 PM (IST)
बिहारमधील जमुई जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. कोचिंग क्लासमधून परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला आणि मुलीला काही पुरुषांनी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी मुलीला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचाही आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींन अटक केली असून हा प्रकार शनिवारी (१९ सप्टेंबर) रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पण या घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महिलांच्या सुरक्षेवरून केंद्रसरकारवर हल्लाबोल केला आहे. वाचा सविस्तर...
21 Sep 2026 04:40 PM (IST)
एशियन गेम्स 2026 (Asian Games)ची सुरुवात भारतीय पुरुष बॅटमिंटन संघाने धमाकेदार विजयासह केली. एकतर्फी सामन्यात लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदांबी श्रीकांतने सर्वोत्तम कामगिरी करताना बांगलादेशला 3-0 असे नमवले. तसेच क्वॉर्टर फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटन संघ जिंकल्यास भारताचे पदक निश्चित होणार आहे. वाचा सविस्तर...
21 Sep 2026 04:38 PM (IST)
ओवैसी म्हणाले की, “बिहारमध्ये एमआयएमचे पाच आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. या भेटीत गडकरींनी आमदारांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. तब्बल 45 मिनिटे त्यांनी वेळ दिला. या भेटीत जुन्या पुलांचा प्रश्न, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधांबाबत आमदारांनी गडकरींना माहिती दिली. त्यानंतर आपण गडकरींना, सर, तुम्ही फोन करून काम सुरू करायला सांगा,” अशी विनंती केली. त्यावर गडकरींनी तात्काळ फोन केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना काम लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या,” असं ओवैसी म्हणाले.
21 Sep 2026 04:17 PM (IST)
पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या यशस्वी प्रयोगानंतर केंद्र सरकार इंधन क्षेत्रात आता आणखी एक मोठं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या CNG आणि घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या PNG गॅसचा नंबर आहे. सरकारने संकुचित बायोगॅस म्हणजेच CBG साठी २३,७३१ कोटी रुपयांची ‘गोवर्धन’ योजना सुरू केली आहे. कचरा आणि शेणापासून मिळणारे उत्पन्न वाढवताना प्रदूषण कमी करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत, सरकार बायोगॅस प्रकल्प मालकांनी उत्पादित केलेला १००% गॅस एकतर खरेदी करेल किंवा तो एका मोठ्या गॅस कंपनीला विकेल. सरकारची नेमकी काय आहे योजना? वाचा सविस्तर...
21 Sep 2026 04:02 PM (IST)
राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राज्यातील बहुतांश भागात खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पुरेशा पावसाअभावी सोयाबीन, कापूस, ऊसाचे पीक करपून गेले आहेत. शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. या परिस्थितीची दखल घेत राज्य सरकारने दुष्काळाचा ट्रिगर १ लागू केला आहे. विरोधी पक्षांकडूनही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना आता राज्य सरकारने यासंदर्भात महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. राज्यातील २० जिल्ह्यांत पावसाचे प्रमाणे राहिल्यामुळे खरीप पिके करपून गेली आहेत. दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे. राज्य सरकारने त्यादृष्टीने पावले उचलत पावले उचलत दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. वाचा सविस्तर...
21 Sep 2026 03:59 PM (IST)
Tukaram Mundhe FDA: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील कारवायांमुळे चर्चेत आहेत. दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील कथित भेसळीविरोधात FDA कडून कारवाई केली जात आहे. हॉटेल आणि खाद्य आस्थापनांची तपासणीही करण्यात येत असल्याने अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, मुंढे यांची FDA मधून पुन्हा बदली होणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना FDA मधून बदली झाल्यानंतर कोणता विभाग हवा, असा प्रश्न विचारण्यात आला.
21 Sep 2026 03:53 PM (IST)
एशियन गेम्स 2026 (Asian Games)ची सुरुवात भारतीय पुरुष बॅटमिंटन संघाने धमाकेदार विजयासह केली. एकतर्फी सामन्यात लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदांबी श्रीकांतने सर्वोत्तम कामगिरी करताना बांगलादेशला 3-0 असे नमवले. तसेच क्वॉर्टर फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटन संघ जिंकल्यास भारताचे पदक निश्चित होणार आहे.
भारताला सुरुवातीलाच लक्ष्य सेनने चांगली सुरुवात करून दिली. बांगलादेशचा खेळाडू अयमान इब्न झमानविरुद्ध खेळताने लक्ष्यने चांगला खेळ दाखवला. पहिल्या सेटमध्ये लक्ष्यने पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. एकापाठोपाठ एक दमदार शॉट्स खेळताना त्याने हा सेट 21-4 अशा मोठ्या फरकाने आपल्या खिशात घातला. लक्ष्यने आपली हिच लय कायम राखताना दुसऱ्या सेट 21-12 असा आपल्या नावे करत सामन्यात भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. लक्ष्यच्या जबरदस्त स्मॅशसमोर झमानला टिकाव धरता आला नाही.
21 Sep 2026 03:45 PM (IST)
एशियन गेम्स (Asian Games) २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची दमदार कामगिरी कायम राहिली. पहिल्या सामन्यात उज्बेकिस्तानला 19-0 असे नमवल्यानंतर संघाने दुसऱ्या सामन्यात इंडोनेशियाचा 17-1 अशा फरकाने गेम केला.
या सामन्यात भारतीय संघातील फॉरवर्ड खेळाडूंनी इंडोनेशियाच्या डिफेन्स फळीचा धुव्वा उडवला. भारतीय संघ सामन्यात सुरुवातीपासूनच वरचढ राहिली. संघाने इंडोनेशियाच्या डिफेन्सवर सलग दबाव निर्माण केला आणि एका पाठोपाठ एक गोल केले. भारताच्या वतीने दीपिका, ऋतुजा पिसाळ आणि नवनीत कौरने शानदार कामगिरी करताना गोल करण्याची आपली हॅटट्रिक पूर्ण केली.
21 Sep 2026 03:30 PM (IST)
Pune/Sports News: ३८ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित करण्यात आलेली बहुचर्चित ‘डर्ट ट्रॅक‘ स्पर्धा येथील गोळीबार मैदानात मोठ्या उत्साहात आणि थरारक वातावरणात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या २२५ हून अधिक रायडर्सनी सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
21 Sep 2026 03:20 PM (IST)
दक्षिण आशियाई देश श्रीलंका (Sri Lanka) सध्या गेल्या काही दशकांतील सर्वात गंभीर आणि भीषण जलसंकटाचा सामना करत आहे. (SriLanka Drought) देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे नद्या, विहिरी आणि सिंचनाचे जलाशय पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या मानवी आणि नैसर्गिक संकटाच्या काळात निसर्गाची अवकृपा दूर व्हावी आणि पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी श्रीलंकेत धार्मिक परंपरेचा आणि आस्थेचा आधार घेतला जात आहे. श्रीलंकन हवाई दलाने (Sri Lanka Air Force) या संकटसमयी एक अनोखा उपक्रम राबवत भगवे वस्त्र परिधान केलेल्या तीन बौद्ध धर्मगुरूंना (भिक्षूंना) विशेष ‘वाय-१२’ (Y-12) लष्करी विमानातून दुष्काळग्रस्त भागांवरून हवाई सफरीवर नेले.
21 Sep 2026 03:01 PM (IST)
पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढली असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर धडक मोहीम उघडली आहे. या मोहिमेत अवघ्या २४ तासांत शहरातील ३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चार पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत तीन प्रौढांसह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
21 Sep 2026 02:59 PM (IST)
सात दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर कालपासून मुंबईकर कोकणवासीय मोठ्या संख्येने परतीच्या प्रवासाला लागलेत. आजही सकाळी मुंबईकडे जाणारी मडगाव-मुंबई मांडवी एक्सप्रेसला मोठी गर्दी पाहायला मिळाली. मुख्य म्हणजे परतीच्या प्रवासाला निघालेल्या अनेक मुंबईकर कोकणवासीयांना जातानाचे कन्फर्म तिकिट न मिळाल्याने मोठी कसरत करीत प्रवास करावा लागतोय. तर गाड्यांना गर्दी असल्याने अनेक प्रवाशी स्थानकातच खोळंबल्याचे पाहायला मिळाले. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येतेय.
21 Sep 2026 02:48 PM (IST)
वसई-विरारमध्ये ८८ पुनर्विकास प्रकल्पांवर पालिकेच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. २०२२ ते २०२५ दरम्यान मंजूर झालेल्या या प्रकल्पांमध्ये नियमापेक्षा अधिक Incentive FSI आणि अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर झाल्याचा फेरतपासणीत मुद्दा समोर आला आहे.
यानंतर पालिकेने संबंधित प्रकल्पांमधील अतिरिक्त बांधकामाला जैसे थे आदेश देत विकासकांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच बांधकामाची स्थिती, विक्री झालेले फ्लॅट आणि दुकानांची माहिती मागवण्यात आली आहे. दरम्यान, विकासकांची सुनावणी पूर्ण झाली असून काही विकासकांनी बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला आहे. आता पुढील निर्णयासाठी प्रकरण राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आलं आहे. घर-दुकानांच्या दस्त नोंदणीला स्थगिती देण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयालाही पत्र देण्यात आलं आहे.
तोपर्यंत संबंधित प्रकल्पांमध्ये नवं बांधकाम किंवा खरेदी-विक्री न करण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे.
21 Sep 2026 02:36 PM (IST)
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, यांच्या माध्यमातून आणि नवदुर्गा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली असून, मंडप उभारणीपूर्वीचा मांगलिक खांब पूजनाचा कार्यक्रम सोमवारी डोंबिवली पूर्वेतील नांदिवली रोड येथील डी.एन.सी. हायस्कूल येथे उत्साहात संपन्न झाला. आचार्य ह.भ.प. प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी आमदार राजेश मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी तसेच दुर्गाभक्त आणि भाविक उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर मंडप उभारणीपूर्वी मांगलिक खांब पूजन करण्यात आले. पूजनावेळी उपस्थित भाविकांनी देवीच्या जयघोषात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन आमदार तथा शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. नवरात्रोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
21 Sep 2026 02:23 PM (IST)
कोकणात घरोघरी बाप्पा विराजमान होत असताना घरोघरी देखावे सुध्दा बनवले जातात. अशाचप्रकारचा लक्षवेधी देखावा कणकवली-कासार्डेतील उत्तर गावठण येथील सावंत भोसले परिवाराकडून बनवला असून चित्रकार सहदेव सावंत याच्या संकल्पनेतून कडक शिस्तीच्या आणि प्रामाणिक व बेधडक प्रशासकीय कामकाजामुळे नेहमीच चर्चेत असणारे तुकाराम मुंडेच्या प्रामाणिकपणा देखाव्यात दाखवले गेला आहे.
विवो: कोकणातील गणेशोत्सव जगाला हेवा वाटावा असा साजरा केला जातो. यातच घरोघरी गणेशोत्सवाची धामधूम असल्याने सजावटीची चढाओढ दिसून येते. यातच काही घरातून पारंपरिक सजावट आजही दिसून येत गणेशोत्सव साजरा करण्याबरोबर सामाजिक बांधिलकीसह एकोप्याने दर्शन घडवून सजावटीतून संदेश देण्याचे कामही केले जाते. असाच देखावा कासार्डे उत्तर गावठण येथील मुंबईस्थित चित्रकार सहदेव सावंत साकारला आहे.
त्यानी महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असणारे व कडक शिस्तीच्या आणि प्रामाणिक प्रशासकीय कामकाजामुळे नेहमीच चर्चेत असणारे महाराष्ट्रातील २००५ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अत्यंत लोकप्रिय आणि धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले अधिकारी तुकाराम हरिभाऊ मुंढे याच्या जीवनावर आधारित देखावा साकारला.
21 Sep 2026 02:10 PM (IST)
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी आणि नियमित कर्जदारांच्या विविध मागण्या सोडवाव्यात, या मागण्यांसाठी किसान सभेने 23 सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनादरम्यान मंत्री आणि आमदारांना काजू-बदाम पाठवून सरकारच्या धोरणांचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला जाणार आहे.
21 Sep 2026 02:00 PM (IST)
जळगाव शहरात अनेक दिवसांपासून वाळू माफिया, जुगार, मटका, गावठी दारू यासारखे अवैध धंदे खूप वाढले होते. यावर आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी स्पेशल टीमची नेमणूक केली. या टीमने एका दिवसांत तब्बल 9 ठिकाणी धाड टाकत कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 10 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 47 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
21 Sep 2026 01:55 PM (IST)
कॅनडामध्ये (Canada) विमान प्रशिक्षणादरम्यान घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Canada Plane Crash) मनोज शिवकुमार आणि श्रीसरन तिरुज्ञानसंबंधम अशी या मृत विद्यार्थ्यांची नावे असून, ते अनुक्रमे तामिळनाडू आणि पुदुचेरी येथील रहिवासी होते. परदेशात जाऊन व्यावसायिक वैमानिक (Commercial Pilot) बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेलेल्या या दोन तरुण विद्यार्थ्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या मूळ गावी आणि भारतीय हवाई क्षेत्रात तीव्र शोककळा पसरली आहे.
21 Sep 2026 01:45 PM (IST)
आपण फोन दिवसभर वापरतो मात्र त्याच फोनच्या फिचरला किती पाहतो. फोनच्या बाजूला तीन बटणे असतात. एक आवाज कमी जास्त करायचं, एक फोन बंद करण्याचे त्या बटणाचं एवढचं काम आहे असे आपल्याला वाटते. परंतू त्या तीन बटणांमध्ये एक सिक्रेट ट्रिक्स वापरलेली आहे. त्याने तुमचे काम एकदम सोपे करते, चला मग बघूया काय-काय काम करते हे तीन बटण…
21 Sep 2026 01:40 PM (IST)
IIT Bombay Student Death: मुंबईतील IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मोठी घडामोड झाली आहे. सलग तीन दिवसांच्या आंदोलनानंतर IIT बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांनी मांडलेल्या १८-सूत्री मागण्यांच्या चार्टरवर स्वाक्षरी केली आहे. रविवारी रात्री प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाल्यानंतर ही घडामोड झाली. मात्र, १८ मागण्यांच्या चार्टरवर संचालकांनी स्वाक्षरी केली असली तरी सर्व मागण्या तातडीने पूर्ण किंवा अंमलात आणण्यात आल्या आहेत, असा त्याचा अर्थ नाही. मागण्यांच्या अंमलबजावणीसह पुढील कार्यवाहीबाबत अधिकृत माहिती समोर येणे अपेक्षित आहे.
21 Sep 2026 01:30 PM (IST)
शिवाजी हळणवर / पंढरपूर : आगामी पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महायुती म्हणूनच लढविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, वेळ आली तर भाजप दोन्ही मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असे स्पष्ट संकेत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिले. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच गोरेंच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न असला तरी परिस्थिती निर्माण झाल्यास भाजप स्वतंत्रपणे दोन्ही जागांवर मैदानात उतरण्याची तयारी ठेवत असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. भाजपकडून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाईलच; परंतु वेळ आली तर पक्ष स्वतंत्रपणेही लढेल. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असून पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, अशी भूमिका गोरे यांनी यावेळी मांडली.
21 Sep 2026 01:20 PM (IST)
Asian Games: २०२६ च्या आशियाई खेळांच्या अगदी पहिल्याच दिवशी, १३ वर्षीय चीनी जलतरणपटू यु झिदीने आपल्या प्रभावी कामगिरीने जगाला थक्क केले. पुढील महिन्यात १४ वर्षांची होणाऱ्या या तरुण खेळाडूने, महिलांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात २ मिनिटे ०५.०८ सेकंदांच्या आशियाई खेळांतील विक्रमी वेळेसह सुवर्णपदक जिंकले. लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकच्या केवळ दोन वर्षे आधी, तिच्या कारकिर्दीतील हे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. हसतमुख यु झिदीने आपली कामगिरी ‘ठीकठाक’ असल्याचे नम्रपणे सांगितले.
21 Sep 2026 01:15 PM (IST)
आयफोन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच भारतात Appleपे (Apple Pay) सुरु होणार असल्याची माहिती मिळतीये. याआधी गुगल पे किंवा फोन पे अशा अॅपवरुन पेमेंट करावे लागत होते, आता मात्र apply स्वतंत्र्य पेमेंट सुरु करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2026 च्या सुरुवातीला Apple Pay भारतात अधिकृतपणे लॉन्च होऊ शकतं. यामुळे आयफोन आणि Apple Watch वापरणाऱ्या लोकांना पेमेंट करणं सोपं तसेच फास्ट होईल.
21 Sep 2026 01:10 PM (IST)
न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA 2026) वार्षिक बैठकीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या बैठकीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या तीव्र लष्करी आणि आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर जर ही भेट झाली, तर ती या युद्धातील सर्वात मोठी राजनैतिक घडामोड ठरेल.
21 Sep 2026 01:01 PM (IST)
शाहूनगर, वाघाळा येथे किरकोळ वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या प्रकरणाचा नांदेड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तेलंगणातील निजामाबाद येथे कारवाई करून सहा आरोपींना जेरबंद केले आहे. १८ सप्टेंबरच्या रात्री शाहूनगर येथील वॉटर फिल्टर टँकजवळ किरकोळ कारणावरून संघरत्न ऊर्फ डोरेमॉन माधव वाघमारे (वय २०) याच्यासोबत काही जणांचा वाद झाला होता, यावेळी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
21 Sep 2026 12:48 PM (IST)
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरण्यासाठी लिंक पाठवून नऱ्हे येथील ३४ वर्षीय व्यक्तीची २ लाख ७९ हजार ७०९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. दंड भरण्यासाठी पाठविलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक खाते आणि क्रेडिट कार्डशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावरील कॉल आणि एसएमएस दुसऱ्या मोबाइल क्रमांकावर फॉरवर्ड करून घेण्यात आले आहे. त्यानंतर या माहितीचा गैरवापर करून बँक खाते आणि क्रेडिट कार्डमधून परवानगीशिवाय रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.
21 Sep 2026 12:36 PM (IST)
शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी नांदेड येथे झालेल्या दुष्काळी आढावा बैठकीत सरकार व महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’च्या मुद्द्यावरून बैठकीत आमदार पाटील आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार पाटील यांनी “इमर्जन्सी लोडशेडिंग कशासाठी करता?” असा थेट सवाल केला. त्यावर लोडशेडिंग होत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांकडे माहिती विचारल्यानंतर “कधी कधी इमर्जन्सी लोडशेडिंग होते,” असे उत्तर देण्यात आले. यावर पाटील यांनी आक्षेप घेत, “कधी कधी नाही, रोजच लोडशेडिंग आहे,” असे सांगितले. विशेषतः संध्याकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केले.
21 Sep 2026 12:24 PM (IST)
गणेशोत्सवाच्या गर्दीत घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचा तिसरा डोळा म्हंटला जाणारा ‘एआय’ देखील नजर ठेवून असणार आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठ परिसरात तब्बल २५० ते ३०० एआय कॅमेऱ्यांचा वॉच ठेवला असून, गर्दीत मिसळलेल्या संशयितांपासून बेवारस वस्तू, आग-धूर आणि अचानक वाढणाऱ्या गर्दीपर्यंत प्रत्येक बाबीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा फोटो सिस्टिममध्ये अपलोड केल्याने तो व्यक्ती कॅमेऱ्याच्या कक्षेत येताच फेस रेकग्निशनच्या माध्यमातून त्याचा अलर्ट देखील पोलिसांना मिळणार आहे.
21 Sep 2026 12:12 PM (IST)
आयटी इंजिनिअरने कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला आहे. नंतर त्याने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. देहूगाव येथे रविवारी (दि.20/9/2026) सकाळी 10:45 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. शुभांगी आकाश बारस्कर (वय 28, रा. देहूगाव, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती आकाश रामदास बारस्कर (वय 26, रा. देहूगाव) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
21 Sep 2026 11:50 AM (IST)
लातूरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरट्यांनी अंदाजे १२ लाख रुपये रोकड आणि चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे.
21 Sep 2026 11:45 AM (IST)
रविवारी खासदार संजय जाधव यांनी रुग्णालयात जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि काळजी घेण्याचा आग्रह केला. तसेच मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या मनोजदादांना आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने लवकर पूर्ण आरोग्य लाभावे, असे म्हटले.
21 Sep 2026 11:35 AM (IST)
आरबीआयने १८ सप्टेंबर रोजी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह आठ संचालकांविरोधात कारवाई केली. त्यामुळे १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक असलेले विद्यामान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह तब्बल पुणे जिल्ह्यातील तब्बल ९ दिग्गज जिल्हा बँक निवडणुकीत अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
21 Sep 2026 11:25 AM (IST)
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. २४ सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती आहे. १ कोटी ६६ लाख लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळणार आहेत.
21 Sep 2026 11:20 AM (IST)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही परीक्षा येत्या 12 आणि 13 डिसेंबरला राज्यभरात घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रांची माहिती परीक्षेपूर्वी 15 दिवस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सीबीएसईने ही माहिती दिली आहे.
21 Sep 2026 11:15 AM (IST)
भारताच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्याच्या वेळापत्रकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या या बहु-स्वरूप दौऱ्यात भारत पाच टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. मात्र, व्यस्त आणि आव्हानात्मक वेळापत्रकामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी कमकुवत संघ मैदानात उतरवावा लागण्याची शक्यता आहे.
21 Sep 2026 11:10 AM (IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास योजना आराखड्यावर (डीपी) दाखल झालेल्या ५६ हजार ७७९ हरकतींपैकी निम्म्याहून अधिक हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित हरकतींवर सोमवारपासून (दि. २१) भोसरी, डुडुळगाव आणि चिखली परिसरासाठी सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती नगररचना विभागाने दिली आहे.
21 Sep 2026 11:03 AM (IST)
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार एंट्री घेतली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे राज्यभरात उकाडा चांगलाच वाढला होता. उन्हाचे चटकेही बसू लागले होते. पण मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवात झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून २४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
21 Sep 2026 10:59 AM (IST)
भारताच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्याच्या वेळापत्रकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या या बहु-स्वरूप दौऱ्यात भारत पाच टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. मात्र, व्यस्त आणि आव्हानात्मक वेळापत्रकामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी कमकुवत संघ मैदानात उतरवावा लागण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे दौऱ्याचे आयोजन आणि सामन्यांच्या क्रमावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या दौऱ्याची सुरुवात २२ ऑक्टोबर २०२६ रोजी क्राइस्टचर्च येथे पहिल्या टी-२० सामन्याने होईल. दुसरा टी-२० सामना २४ ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्च येथे, तिसरा टी-२० सामना २७ ऑक्टोबर रोजी वेलिंग्टन येथे, चौथा टी-२० सामना ३० ऑक्टोबर रोजी ऑकलंड येथे आणि पाचवा व अंतिम टी-२० सामना १ नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे खेळला जाईल. सर्व टी-२० सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होतील.
21 Sep 2026 10:51 AM (IST)
सुचिका तारियालने एमएमएमध्ये कांस्यपदक जिंकले. सुचिका तारियालने आशियाई क्रीडा स्पर्धेत मिक्स्ड मार्शल आर्ट्स (एमएमए) मध्ये भारतासाठी एक ऐतिहासिक पदक जिंकले आहे. सुचिका तारियालने कांस्यपदक पटकावले आहे.
भारताच्या सुचिका तारियालने महिलांच्या ६० किलो वजनी गटातील मिक्स्ड मार्शल आर्ट्स (एमएमए) स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच समाविष्ट झालेल्या एमएमएमधील भारताचे हे पहिले पदक आहे.
21 Sep 2026 10:28 AM (IST)
अभिनेत्री श्रुती हासन तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. वैयक्तिक आयुष्य असो किंवा महिलांशी संबंधित विषय, ती अनेकदा आपलं मत मोकळेपणाने मांडताना दिसते. नुकतंच तिने मासिक पाळी आणि त्या काळात महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांगताना पीसीओएसमुळे (PCOS) तिला वेदनादायक मासिक पाळीचा त्रास होत असल्याचं म्हटलं.
21 Sep 2026 10:10 AM (IST)
अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. उपचारांनंतर आता त्या कॅन्सरवर मात करत पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात करत आहेत. त्यांच्या आजाराबद्दल पती, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
21 Sep 2026 10:00 AM (IST)
पॅन-इंडिया स्टार रश्मिका मंदाना हिच्या आगामी ‘मायसा’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा दमदार टीझर आता रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये रश्मिका एका आक्रमक, रफ-टफ आणि संतप्त अवतारात दिसत असून, तिचा हा अंदाज याआधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ‘मायसा’ हा २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
21 Sep 2026 09:50 AM (IST)
West Bengal Politics: पश्चिम बंगालच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. नंदीग्राम पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या घडामोडीनंतर तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमधील जवळीक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.याच पार्श्वभूमीवर बोलताना टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी 'इंडिया' आघाडी (INDIA Alliance) राज्यात सक्रिय असल्याचे स्पष्ट केले आहे.
हुगळी येथे बोलताना खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले की, काँग्रेस आणि टीएमसीमधील 'इंडिया' आघाडी पूर्णपणे कार्यरत आहे.राहुल गांधी हे सातत्याने तृणमूल काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात असून नंदीग्रामची जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
21 Sep 2026 09:40 AM (IST)
Tata Trusts Tata Sons: टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. टाटा सन्सच्या संचालक मंडळाने (बोर्ड) एन. चंद्रशेखरन यांची चेअरमनपदावर पुढील ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी केलेली फेरनियुक्ती टाटा ट्रस्ट्सने कायदेशीर नियमांचे उल्लंघन ठरवत फेटाळून लावली आहे. टाटा सन्सच्या बोर्डाच्या बैठकीत एन. चंद्रशेखरन यांना पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा चेअरमनपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव ४-१ अशा बहुमताने मंजूर करण्यात आला होता. सर्वाधिक भागधारक असलेल्या टाटा ट्रस्ट्सने प्रसिद्धीपत्रक जारी करत या निर्णयाला आव्हान दिले आहे.






