पुणे– पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth) तर चिंचवडमध्ये भाजपा दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागी पोटनिवडणुक होत आहे. या ठिकाणी आता २६ तारखेला मतदान होणार आहे. दरम्यान, कसबा पोटनिवडणूक उमेदवारीवरुन भाजपात अंतर्गत नाराजी असल्यांच बोललं जात आहे. तर कसब्यातून मुक्ता टिळक यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देता, भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून, दुसरीकडे नाराजी व्यक्त केली जात आहे.
कसे आहे जातीय मतांचे समीकरण?
कसबा पेठ मतदार संघातील मतांचे जातीय समीकरण पाहिलं तर मराठा आणि ओबीसी वर्ग 35 टक्के आहे. ब्राह्मण समाज 25 ते 30 टक्के आहे. मागासवर्गीय समाज 18 टक्के तर 10 टक्के मुस्लीम समाज आहे. कसब्यात जे पोस्टर लागले होते, त्यात तिघांच्या नावाचा उल्लेख आहे, हे तिघेही ब्राह्मण समाजाचे आहेत. त्यामुळं हा समाज भाजपा उमेदवाराला मतदान न करता नोटाला मतदान करणार असल्याचं बोललं जात आहे.
ब्राह्मण मतदारांमध्ये नाराजी…
कसबा पोटनिवडणूकीत टिळक यांच्या कुटुंबियांनाच उमेदवारी मिळेल असं सांगितलं जात होतं. मात्र, टिळक यांच्या कुटुंबीयांना भाजपने तिकीट दिलं नाही. कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळं ब्राम्हण मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. काही दिवसांपूर्वी कसब्यात झालेली पोस्टरबाजी यामुळं भाजपची धाकधूक वाढली आहे. ब्राह्मण उमेदवार नसल्यानं ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा मतदारसंघ गेला. आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? कसब्यातील एक जागरुक मतदार. या आशयाची पोस्टरबाजी करण्यात आली होती. भाजपनं कसब्यातून ब्राह्मण उमेदवार का दिला नाही? अशी नाराजी ब्राह्मण मतदारांनी केली आहे.