बिहार निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचाली वेगवान झाल्या असून पंजाब काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाने माजी आमदार नवज्योत कौर सिद्धू यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या काँग्रेस नेते व माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून पक्षात निष्क्रीय राहणे आणि काँग्रेसच्या भूमिकेविरुद्ध वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपद आणि तिकीट देण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या डील होत असल्याचा दावा केला होता.या वक्तव्यामुळे पक्षात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. विरोधकांनीही यावरून जोरदार टीका केली. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून दोन दिवसांत निलंबनाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.














