Breaking News अपडेट
20 Sep 2025 10:25 AM (IST)
सातारा येथील कराडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कराड बस स्थानक परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीच्या दुकानात ग्राहक आणि दुकानातील कर्मचारी यांच्यात वाद झाला. या वादात तरुण ग्राहकाचा मृत्यू झाला आहे. बातमी सविस्तर वाचा...
20 Sep 2025 10:17 AM (IST)
लोकप्रिय टेक ब्रँडने जर्मनीमध्ये त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A17 4G लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या 4G स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत केवळ 15 हजार रुपये आहे. हा स्मार्टफोन सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटमध्ये आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने दावा देखील केला आहे की, या बजेट स्मार्टफोनला 6 वर्षांपर्यंत अँड्रॉईड अपडेट्स दिले जाणार आहेत.
20 Sep 2025 10:05 AM (IST)
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर दुसरा सामना भारताने जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. यावेळी, महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ देखील भारत आणि श्रीलंकेत ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी ही एक अग्निपरीक्षा मानली जात आहे.
20 Sep 2025 09:59 AM (IST)
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने ओमानविरुद्ध फलंदाजी न करता सर्वांना आश्चर्यचकित केले. तथापि, त्याने सामन्याच्या सादरीकरणादरम्यान विनोदी उत्तर देत ओमान संघाचे आणि हार्दिक पंड्याचे कौतुक केले. भारतीय कर्णधाराने सामन्यात त्याच्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल विनोद केला. सर्वांना खेळण्याची संधी देण्यासाठी त्याने स्वतःला ११ व्या क्रमांकावर ठेवले. ओमानविरुद्ध, सूर्या वगळता सर्वांनी फलंदाजी केली, जो चर्चेचा विषय होता.
20 Sep 2025 09:50 AM (IST)
पुढील आठवड्यात फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज 2025 सुरु होणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, 23 सप्टेंबरपासून सेल सुरु होणार असून या सेलमध्ये ग्राहकांना अनेक वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा सेल सुरु होण्यापूर्वी कंपनीने आणखी एक घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हा आगामी सेल क्विक कॉमर्स आर्म Flipkart Minutes वर देखील लाईव्ह असणार आहे. हि सेवा 24 तास सुरु राहणार आहे.
20 Sep 2025 09:40 AM (IST)
सोलापूर: सोलापूर मधून एक थरारक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीप चालविताना कारला कट दिल्याने वाद झाला, त्यानंतर शिवीगाळ करत जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात अनमोल केवटे (रा. मंद्रुप, जि. सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला तर सोनाली भोसले (रा. अंत्रोली, जि. सोलापूर) या गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना लातूर-सोलापूर मार्गावर बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेत विष्णू मामडगे यासह चौघांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
20 Sep 2025 09:34 AM (IST)
फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या गेमर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये नवीन टॉप – अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायमंड टॉप अप केल्यानंतर ट्रबल ट्रिकस्टर कटाना स्किन, शूज, हॅट, शॉर्ट आणि फेस पेंट सारखे आकर्षक रिवॉर्ड्स मिळणार आहेत. यासोबतच विंग्स ऑफ विक्टरी बॅनर जिंकण्याची संधी देखील प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये मिळणार आहे.
20 Sep 2025 09:28 AM (IST)
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज सुपर चारचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. सुपर चारच्या या आशिया कपच्या मधल्या स्टेजला चार संघ खेळणार आहेत. पहिल्या गटामधून भारत आणि पाकिस्तान हे दोन देश आहेत तर दुसऱ्या गटामधून श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन संघ सुपर चार मध्ये पात्र ठरले आहे. आज सुपर चारचा पहिला सामना रंगणार आहे हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
20 Sep 2025 09:22 AM (IST)
भारतात आज 20 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,134 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,206 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,351 रुपये आहे. भारतात काल 19 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,116 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,189 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,337 रुपये होता.
20 Sep 2025 09:15 AM (IST)
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना चंद्रपुरात खूनप्रकरण समोर आले आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञाताने तरुणाचा गळा चिरून हत्या केली. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथे शुक्रवारी (दि.19) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
20 Sep 2025 09:09 AM (IST)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन केले जात आहे. त्यातच आज पंतप्रधान मोदी हे गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचा गुजरात दौरा भावनगर येथे सुरू होणार असून, ते ‘समुद्रातून समृद्धी’ कार्यक्रमात सहभागी होतील आणि 34200 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या कार्यक्रमात सागरी आणि बंदर क्षेत्रासाठी नवीन धोरणाची घोषणा देखील केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
20 Sep 2025 09:07 AM (IST)
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या मागण्यांसाठी एसटी प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील संघटनेकडून केला जाण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन करू असा इशारा सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे.
20 Sep 2025 08:55 AM (IST)
ठाणे शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका नवनिर्मित इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून पडून एका स्टोअर मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना ढोकाळी परिसरातील हायलँड पार्कमधील बिल्डिंग नंबर 2 येथे घडली असून, दुपारी 2.35 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीचे बांधकाम सुरु होते.
Marathi Breaking News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचा गुजरात दौरा भावनगर येथे सुरू होणार असून, ते ‘समुद्रातून समृद्धी’ कार्यक्रमात सहभागी होतील आणि 34200 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
पंतप्रधान मोदींचा दौरा सकाळी साडेदहा वाजता भावनगर येथे एका कार्यक्रमाने सुरू होईल, जिथे ते एका मोठ्या जनसभेला संबोधित करतील. त्यानंतर ते धोलेराचे हवाई सर्वेक्षण करतील आणि दुपारी दीड वाजता आढावा बैठक घेतील. त्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान लोथल येथे बांधल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (NMHC) च्या विकासकामांचा आढावा घेतील आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील.
दरम्यान, सुमारे 4500 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारे हे कॉम्प्लेक्स 375 एकरमध्ये पसरलेले आहे. त्यात जगातील सर्वात उंच दीपगृह संग्रहालय (७७ मीटर), १४ गॅलरी, किनारी राज्य मंडप, चार थीम पार्क आणि एक तरंगते रेस्टॉरंट यांचा समावेश असणार आहे. यामध्ये १०० खोल्यांचे तंबू शहर आणि रिसॉर्ट, ई-कार सुविधा आणि ५०० इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंगचा समावेश असेल.