Top Marathi News Today Live : प्रचारतोफा थंडावल्या तरीही उमेदवारांना घरोघरी जाऊन भेटी देता येणार
14 Jan 2026 11:25 AM (IST)
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीतील घराला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे अधिकृत निवासस्थान दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील २१ मदर तेरेसा क्रेसेंट रोड येथे आहे. बुधवारी सकाळी ८:०५ वाजताच्या सुमारास ही आग लागली.
14 Jan 2026 11:15 AM (IST)
“प्रचार संपलेला आहे काल. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिलेला आहे. प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करु शकता. तो ही घराघरात जाऊन. एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो ही आधीची पंरपरा होती. अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशी भूमिका त्यांनी काल घेतली. प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करु शकतात. सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशाचं वाटप सुरु आहे. पैशाची पाकिटं साडीतून, वृत्तपत्रातून पैशाचं वाटप सुरु आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
14 Jan 2026 11:05 AM (IST)
पानिपतची लढाई केवळ एका पराभवाची नव्हे तर देशभक्तीच्या उच्च आदर्शांची शिकवण देणारी घटना आहे. मराठा योद्ध्यांचे धैर्य, रणनीती, आणि बलिदान इतिहासात अमर आहे. आजच्या दिवशी पानिपत मराठा शौर्य दिन हा दिवस मराठा साम्राज्याच्या पराक्रमाला आणि त्यागाला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. 14 जानेवारी 1761 रोजी घडलेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या लढाईत मराठा साम्राज्याने अफगाण शासक अहमदशहा अब्दालीच्या प्रचंड सैन्याविरुद्ध पराक्रमाने लढा दिला. जरी या युद्धात मराठ्यांना पराभव पत्करावा लागला, तरी त्यांच्या शौर्य, त्याग, आणि देशभक्तीची कथा आजही प्रेरणादायी आहे.
14 Jan 2026 11:00 AM (IST)
दौंड तालुक्यातील कुसेगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांवर निलंबित करण्याची कारवाई पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली आहे. या कारवाईमुळे दौंड तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कुसेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय व बाजार व्यावसायिक गाळे इमारत बांधकाम करताना कोणत्याही शासकीय नियमांचे पालन केले नाही. सरकारी निधीचा गैरवापर करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवून सन २०२१ ते २०२६ पर्यंतच्या तत्कालीन सरपंच, उपसरपंच व ७ सदस्यांना पदावरून हटविण्यात आल्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
14 Jan 2026 10:50 AM (IST)
Samsung Galaxy A07 5G स्मार्टफोन थायलँडमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Samsung च्या A-सीरीज लाइनअपमध्ये जोडण्यात आलेला एक नवीन 5G ऑप्शन आहे. हा फोन सॅमसंगच्या रीजनल वेबसाईटवर किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट करण्यात आला आहे. कंपनीने गेल्यावर्षी Galaxy A07 4G स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर आता स्मार्टफोनचा 5G व्हेरिअंट देखील लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत बजेट रेंजमध्ये आहे. यामध्ये दिर्घकाळ चालणारी बॅटरी आहे. Galaxy A07 चा 4G व्हेरिअंट ऑक्टोबर 2025 मध्ये Galaxy F07 4G आणि Galaxy M07 4G सह भारतात लाँच करण्यात आला होता.
14 Jan 2026 10:40 AM (IST)
आजच्या धावपळीच्या जगात लोक कामाला अधिक प्राधान्य देतात पण यात फिटनेस कुठेतरी दूर राहून जातो. शरीर सदृढ ठेवायचं असेल तर आपल्या आरोग्याची काळजी घेणं आणि व्यायाम करणं फार गरजेचं ठरतं. काही लोक कामाअभावी फिटनेस करणं टाळतात तर काही आपल्या आळशीपणामुळे यापासून दूर पळतात. अशात अलिकडेच एका आजोबांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे ज्यात ते आपला फिटनेस दाखवत अनोखे करतब करताना दिसून आले. वय वाढत असतानाही एक वृद्ध व्यक्ती इतका फिट आहे ही गोष्ट अनेक तरुणांना लाजवणारी आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्ती ज्या चपळतेने आणि उत्साहाने फिटनेस मूव्हज करताना दिसत आहेत ते पाहून सिद्ध होते की वय तर फक्त एक नंबर आहे आपल्या मनात जिद्ध असेल तर आपण काहीही करु शकतो.
14 Jan 2026 10:30 AM (IST)
वॉशिंग्टन : नुकतेच अमेरिकेने ३ जानेवारी २०२६ रोजी व्हेनेझुएलावर (Venezuela) तीव्र हल्ला केला होता. यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवल्याचा आणि अमेरिकेत ड्रग्जचे जाळे पसरवल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ट्रम्प यांनी हा हल्ला व्हेनेझुएलाच्या सांगण्यावरुनच केला असल्याचे म्हटले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
14 Jan 2026 10:24 AM (IST)
भारतातील सण-उत्सवांमध्ये मकर संक्रांतीला (Makar Sankranti) अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २०२६ मध्ये, मकर संक्रांतीचा मुख्य मुहूर्त बुधवार, १४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजून १३ मिनिटांनी आहे. इंग्रजी तारखेनुसार येणारा हा एकमेव हिंदू सण भारताच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या नावांनी आणि संस्कृतींनी ओळखला जातो. चला तर मग जाणून घेऊया, या एकाच सणाचे देशाच्या विविध भागांत बदलणारे रंग. वाचा सविस्तर
14 Jan 2026 10:00 AM (IST)
सुंदर निवृत्ती तायड (वय ३४, रा. रामपुरी ता. गेवराई, जि. बीड) असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी याच्याविरुद्ध गुन्ह्याचे दोषारोप पत्र सत्र न्यायालय बीड येथे दाखल करण्यात आलेले होते. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपत्रातील सर्व साक्षीदार तसेच तपास कामी गोळा केलेले सर्व पुरावे यावरून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुंदर निवृत्ती तायड याला बीड येथील सत्र न्यायालयाने २० वर्ष कारवास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
14 Jan 2026 09:55 AM (IST)
मध्यरात्री सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने दुसऱ्या दिवशी मध्यरात्री घरासमोर उभी केलेली दुचाकी पेटवून दिली. या आगीमुळे दुकानाचा बोर्ड आणि दुकानातील सामानाचे देखील नुकसान झाले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना १२ जानेवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील अहिल्याबाई होळकर चौकात घडली.
14 Jan 2026 09:50 AM (IST)
राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान होणार आहे. तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी निवडणुकीच्या प्रचारासाठी मुदत संपली आहे. दरम्यान आज ठाण्यात मंत्री नितेश राणे यांनी निवडणुकीसंदर्भात एक भाष्य केले आहे.त्या विधानामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
14 Jan 2026 09:45 AM (IST)
संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे पतीसह राहणाऱ्या २७ वर्षीय गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१३) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त करत फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.
14 Jan 2026 09:41 AM (IST)
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी घसरण झाली. याचा परिणाम आज बुधवारी देखील पाहायला मिळणार आहे. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,७३८ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ५३ अंकांनी कमी होता.
Marathi Breaking News Updates : पुणे, नागपूर, मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या जाहीर प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता थंडावल्या. मात्र, जाहीर प्रचार संपला असला तरी उमेदवाराला ‘डोअर टू डोअर’ म्हणजेच घरोघरी प्रचार करण्याची मुभा असणार आहे. उमेदवार पाच पेक्षा कमी लोकांना सोबत घेऊन वैयक्तिक पातळीवर प्रचार करू शकतात, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी जाहीरसभा, प्रचार रॅली निघणार नाही. मात्र, वैयक्तिक पातळीवर प्रचार करता येणार आहे. याची माहिती निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिली. ते म्हणाले, अर्थातच हा नियम मी नव्याने तयार केलेला नाही. तो आधीपासूनच अस्तित्वात होता. यासाठी त्यांनी २०१२ सालच्या निवडणूक आयोगाचा दाखलाही दिला. मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबत असतो. मात्र, यावेळी उमेदवाराला या ४८ तासाच्या कालावधीत घरोघरी जाऊन वैयक्तिक पातळीवर प्रचार करण्याची मुभा असेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.






