Maharashtra Breaking News
Marathi Breaking news updates- डिसेंबर महिन्यात तापमानात घसरण होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यात उत्तर भारतात तीव्र थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक राज्यांतील तापमान शून्यापेक्षाही खाली गेल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांत तीव्र थंडी, दाट धुके आणि प्रदूषणाच्या एकत्रित परिणामांना तोंड देत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये पारा गोठणबिंदूच्या खाली गेला आहे. ईशान्येकडील राज्यात हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, डिसेंबरमधील थंडी देशाच्या अनेक भागात दिसून येत आहे. उत्तर भारतात सध्या थंडी, प्रदूषण, धुके पाहिला मिळत आहे.
13 Dec 2025 06:00 PM (IST)
BJP News: भाजपने दक्षिणेत मोठी कामगिरी केली आहे. भाजप गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र पक्षाला म्हणावे तसे यश प्राप्त झालेले पाहायला मिळाले नाही. मात्र केरळमधील निवडणुकी भाजपने खाते उघडले आहे. डाव्या पक्षांच्या सत्तेला भाजपने सुरू लावला आहे. यामुळे केरळच्या राजकरणात भूकंप झाला आहे.
13 Dec 2025 05:33 PM (IST)
हौसिंग सोसायट्यांमधील इमारतींतील लिफ्ट अपघात टाळण्यासाठी कालबाह्य नियमांऐवजी नवीन आणि आधुनिक कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली. लिफ्टच्या सुरक्षितता व देखभालीसाठी सध्या लागू असलेले नियम १९५८ सालच्या लिफ्ट सुरक्षा धोरणावर आधारित असून, ते आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि वाढत्या इमारतींच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे अपुरे ठरत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
13 Dec 2025 05:12 PM (IST)
रमेश सिप्पी यांच्या रेकॉर्डब्रेकिंग ब्लॉकबस्टर चित्रपट ‘शोले’ ला ऑगस्टमध्ये ५० वर्षे पूर्ण झाली आणि आता १२ डिसेंबर रोजी हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आला आणि त्याचे न कापलेले व्हर्जन ४K मध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटात प्रेक्षकांना मूळ क्लायमॅक्स तर पाहायला मिळालाच पण ‘शोले’ मधून वगळण्यात आलेले किंवा काही कारणास्तव चित्रपटाचा भाग होऊ शकलेले नाही असे दृश्यही पाहायला मिळाले. ‘शोले’ मध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांना जय आणि वीरूच्या भूमिकेत पाहून चाहते खूप आनंदी झाले. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी एक्स वर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर केल्या, तर ‘ही मॅन’ धर्मेंद्रला पाहून ते भावूकही झाले. २४ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर ‘शोले’ चित्रपटगृहात दाखल झाला आहे.
13 Dec 2025 04:55 PM (IST)
आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर (इको रिक्षा)चालक मालक संघटनेने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.यावेळी जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टाके देवी चालक-मालक संघटना मोहोपाडा अध्यक्ष विकास पारंगे,उपाध्यक्ष हभप बाळाराम महाराज कुरंगळे यांच्यावतीने संघटनेच्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी स्वीकारले. मोर्चात मोठ्या संख्येने विक्रम मिनिडोअर चालक, मालक सहभागी झाले होते.यात सहा आसनी मिनीडोअर वाहनांची ग्रामीण भागासाठी पाच वर्षे वयोमर्यादा वाढविण्यात यावी, चारचाकी सहा आसनी बीएस फोर मानांकीत बदली वाहनांकरिता इंधन म्हणून सीएनजीच्या वापरास मान्यता मिळावी, कोरोना काळात लागूझालेले सानुग्रह अनुदान विक्रम, मिनीडोअर मॅजिक इको या मीटर टॅक्सी परवानाधारकांना मिळावे, व्यवसाय कराचा भरणा करण्यासाठी दंड व व्याज न आकारता सूट मिळावी. इको टॅक्सीला नवीन डिव्हाईस बसविण्यासाठी अतिरिक्त खर्च होत आहे. ही तांत्रिक लूट थांबविण्यात यावी. ऑनलाईन टॅक्सीपरमीट बंद करावे. १५ वर्षांवरील मिनीडोअर पासिंग साडेचार हजार रुपयांवरून नऊ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे, ती रद्द करण्यात यावी, अशा अनेक मागण्या मोर्चाच्या माध्यमातून विक्रम मिनिडोअर धारकांनी केल्या आहेत.
13 Dec 2025 04:50 PM (IST)
भाईंदरच्या प्लेझंट पार्क परिसरातील मोकळ्या भूखंडावर आज पहाटे साढे तीनच्या दरम्यान भीषण आग लागली. सुदैवाने यात कुणी जखमी झालं नाही. या ठिकाणी तिसऱ्यांदा आगी लागली आहे. अनधिकृत फर्निचर दुकानांना ही आग लागली होती. या ठिकाणी अनधिकृत फर्निचर, गॅरेज, नर्सरीची दुकाने आहेतं. ही अनधिकृत दुकाने खाली करण्याची मागणी कॅाग्रेसने वेळोवेळी केली होती. मात्र पालिकेने लक्ष न दिल्याचा आरोप कॅाग्रेसने केला होता. मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने दोन तासांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.
13 Dec 2025 04:45 PM (IST)
कर्जत तालुक्यात हजारो वन जमिनीचा वापर करून टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी वन जमिनीवर बुलडोझर फिरवला जाणार असून कर्जत तालुक्यात पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास कारणीभूत ठरणार आहे, दरम्यान कर्जत तालुक्यात पाच धरणे बांधली जात असून असून कर्जत तालुका भविष्यात भूकंप प्रवण तालुका बनणार आहे.
13 Dec 2025 04:40 PM (IST)
बीजेपीच्या माजी नगरसेविका प्रीती पाटील यांच्या कामावर विश्वास ठेवून शेकडो शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला.हा प्रवेश आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत झाला.महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय हालचालीही वेग घेत आहेत
13 Dec 2025 04:30 PM (IST)
पहाटे साडेतीनच्या सुमारास प्लेझंट पार्क परिसरात झालेल्या भीषण अग्नितांडवाची बातमी प्रसारित होताच या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वारंवार अनधिकृत जागांवर उभ्या असलेल्या फर्निचर दुकाने व गॅरेजना आग लागण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
13 Dec 2025 04:25 PM (IST)
घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथे सर्वसामान्य ठाणेकरांसाठी तिसरे नाट्यगृहाची निर्मिती होत आहे. ७ हजार ३५० स्क्वे.मीटर जागेवर अतिशय भव्य असे नाट्यगृह होत आहे. राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहानंतर ठाणेकरांना वाघबीळ येथे तिसरे नाट्यगृह उपलब्ध होणार आहे. याचा फायदा निश्चितच घोडबंदर येथील नागरिकांना होणार असून अद्ययावत असे नाट्यगृह मिळणार असून याचे भूमीपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
13 Dec 2025 04:20 PM (IST)
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आणि सह्याद्री पर्वताच्या उंच रांगांमध्ये असलेला ऐतिहासिक रांगणागड मागील काही वर्षात पर्यटक तसेच गिर्यारोहणास येणाऱ्यांसाठी औत्सुक्याचा विषय बनला आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील नारूर या गावातून या रांगणागडावर जाण्यासाठी पर्यटकांना वनविभागाकडून विशेष सुविधा देण्यात येत आहेत. दरवर्षी या गडावर हजारो पर्यटक भेट देत असून यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पर्यटन वाढीस चालना मिळत आहे.
13 Dec 2025 04:15 PM (IST)
अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरातील १४ / १५ व्या शतकातील पुरातन व ऐतिहासिक महत्व असलेली माळीवाडा वेस हटविण्याबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. परंतु महापालिकेच्या या जाहीर प्रसिद्धीनंतर शहरात नागरिकांकडून तीव्र संताप महापालिकेच्या विरोधात व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात आता माळीवाडा ग्रामस्थांकडून माळीवाडा वेस येथे नागरिकांकडून हरकती अर्ज भरून घेण्यात येत आहे.
13 Dec 2025 04:10 PM (IST)
मुंबई–गोवा महामार्ग रखडल्याने नागरिकांचा संयम सुटताना दिसत आहे. महामार्गाच्या कामातील दिरंगाई, शासन–प्रशासन आणि ठेकेदारांच्या अपयशाच्या निषेधार्थ मुंबई–गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने आज तिरडी मोर्चा काढला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून सुरू झालेल्या या आंदोलनाची सांगता १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी सावर्डे ते संगमेश्वर दरम्यान रास्ता रोको आंदोलनाने होणार आहे. दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा जनआक्रोश समितीने दिला आहे.
13 Dec 2025 03:54 PM (IST)
सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीचा जगभरातील इतिहास आता पुन्हा नव्या रुपाने शाळकरी मुलं आणि इतिहासप्रेमींना अनुभवता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS), मुंबई येथे ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट : अ स्टडी गॅलरी ऑफ इंडिया अँड द एन्शंट वर्ल्ड’ हे नवीन दालन शुक्रवारी 12 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाले. भारतातील प्रेक्षकांसाठी प्रथमच जागतिक स्तरावर निवडलेली एक भव्य शैक्षणिक दालन मुंबईत खुले झाले आहे. सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन जगाचा परस्परसंबंध व्यापार, लेखन, धर्म, कला आणि विचारांच्या देवाणघेवाणीमुळे कसा घडला याची सखोल ओळख प्रेक्षकांना या दालनातून मिळणार आहे.
13 Dec 2025 02:50 PM (IST)
अभिनय क्षेत्र म्हटलं की दिसायला छान गोरी पान, उंच आणि सडपातळ बांधा असा एकंदरीतच अलिखित नियम सर्वासाधारण पाहायला मिळतो ते अगदी आजही. मात्र ज्या काळात महिलांनी घराबाहेर पाऊल ठेवणं देखील चुकीचं मानलं जातं होतं त्याचकाळात एका गुणी आणि संवेदनशील अभिनेत्रीने या क्षेत्रातील हे अलिखित नियम खोडून काढले. आजही तिच्या अभिनयाचं कौतुक तर होतंच पण तिच्या त्या सावळ्या रंगातील सौंदर्य देखील तितकंच भारावतं ती हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. जैत रे जैत मधील चिंगी असो किंवा उंबरठा मधील सुलभा हे दोन्ही चित्रपट आणि स्मिता पाटील हे एक समीकरणचं तयाऱ झालेलं आहे. स्मिता पाटील यांचा अभिनय तर उत्तम होताच पण त्यातबरोबर त्या वृत्तनिवेदिका देखील होत्या.
13 Dec 2025 02:45 PM (IST)
२०२६ हे नवीन वर्ष काही दिवसातच सुरू होणार आहे. नवीन वर्षात तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळेल का, की तुम्ही तुमच्या प्रेयसीशी ब्रेकअप कराल? नवीन वर्षात तुमचे करिअर, आरोग्य आणि पैसा कसा असेल? अधिक जाणून घेण्यासाठी, १ ते ९ या क्रमांकांसाठी नवीन वर्षाचे अंकशास्त्र आपण या लेखातून पाहणार आहोत. १ क्रमांकाचे वर्ष नेहमीच नवीन सुरुवात, स्वावलंबन, नेतृत्व आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते. २ क्रमांकाचे वर्ष शांती, संतुलन, सहकार्य आणि संयमाचे प्रतीक आहे. ३ क्रमांकाचे वर्ष सर्जनशीलता, आत्म-अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. ८ क्रमांकाचे वर्ष तुमच्या आयुष्यात निर्णायक ठरेल. अंकशास्त्र तज्ज्ञ आनंद पाठक यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
13 Dec 2025 02:40 PM (IST)
नववर्षांच्या आगमनाला काही दिवस उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे तितक्याच जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले असताना पोलिसांनी कंबर कसली आहे. सध्या पोलिसांकडून हॉटेल, लॉज, कॉटेजचालक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अंमली पदार्थाची विक्री होत असल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
13 Dec 2025 02:35 PM (IST)
आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणार आहे. दहा संघ एकूण ३५९ खेळाडूंवर बोली लावतील. तथापि, लिलावाच्या अगदी आधी, माजी भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर मॉक लिलाव केला. ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीन मॉक लिलावात मोठ्या बोलीचे लक्ष्य होता. ग्रीन चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला आणि त्याला ₹२१ कोटी (अंदाजे $२.१ अब्ज) मध्ये बोली लावण्यात आली. हा अष्टपैलू खेळाडू सर्वात महागडा खेळाडू देखील होता. दरम्यान, लियाम लिव्हिंगस्टोन आणि वेंकटेश अय्यर यांना जास्त बोली मिळाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात समाविष्ट करण्यात आले.
13 Dec 2025 02:30 PM (IST)
राजधानी दिल्लीतील संसदेवरील झालेल्या हल्ल्याला आज २५ वर्षे पूर्ण झाली. १३ डिसेंबर २००१ रोजी सकाळी भारताच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेल्या भारतीय संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला देश कधीही विसरू शकत नाही. संसदेवरील हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त, देशाच्या लोकशाहीच्या मंदिराला ओरखडेही येऊ नयेत यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर शहीदांच्या आठवणीही आज ताज्या झाल्या
13 Dec 2025 02:25 PM (IST)
आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, त्यांनी आपल्या करिअरमध्ये एक मोठे पाऊल उचलले आहे. अनेक वर्षे पॅरोडी आणि कॉमिक व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर, आता त्यांनी दिग्दर्शनाच्या दुनियेत आपल्या पहिल्या वेबसीरिज ‘एकाकी’सह पदार्पण केले आहे. हॉरर-कॉमेडी थ्रिलरवर आधारित या सीरिजचे पहिले दोन भाग प्रदर्शित झाले असून, प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
13 Dec 2025 02:20 PM (IST)
कोणत्याही कलाकृतीसाठी तिचे शीर्षक खूप महत्त्वाचे असते. चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात शीर्षकाची मोठी भूमिका असते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार गजेंद्र अहिरे यांचा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’.या नावावरूनच हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असल्याचे लक्षात येते. मात्र ही प्रेमकथा वेगळी असून, त्यात अनेक नाट्यमय वळणे पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातून गजेंद्र अहिरे पुन्हा एकदा नावीन्यपूर्ण विषय मांडणार आहेत.‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’चे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
13 Dec 2025 02:15 PM (IST)
शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी असली की अशा शाळा बंद करण्याची तयारी केली जाते. असे असताना आता शाळांमध्ये विद्याथीं पटसंख्या कमी असली म्हणून यापुढे राज्यातील कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. राज्यातील जिल्हा परिषदांमधील (जिल्हा परिषदा) प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया (बदली प्रक्रिया) आणि रिक्तपदांच्या स्थितीवर प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली.
13 Dec 2025 02:10 PM (IST)
अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला असून भारतीय फुटबॉल चाहते मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत. मेस्सी तीन दिवसांसाठी भारत दौऱ्यावर असून त्याच्या दौऱ्याला ‘GOAT इंडिया टूर’ असे नाव दिले गेले आहे. दरम्यान कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये “मेस्सी मॅजिक” पाहण्यासाठी गर्दीम केलेल्या चाहत्यांना खूप वाईट वाटले आणि त्यातून हिंसक वळण देखील लागल्याचे दिसून आले. नेमकं काय घडले त्याबद्दल आपण पाहूया.
13 Dec 2025 02:05 PM (IST)
बांगलादेशात (Bangladesh) एक खळबळजनक घटना घडली आहे. शेख हसीनाच्या (Sheikh Hasina) विरोधकावर गोळीबार करण्यात आला आहे. शुक्रवारी (१२ डिसेंबर) ढाका येथे ही घटना घडली. यामुळे देशभरात मोठा गोंधळ उडाला आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा बांगलादेशमध्ये अगामी सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरु आहे.
13 Dec 2025 02:00 PM (IST)
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा एका सोशल मीडिया व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) चर्चेत आले आहेत. हा व्हिडिओ तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय ट्रस्ट पीस फोरम’ (International Trust Peace Forum) दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला की, शरीफ यांनी सुमारे ४० मिनिटे वाट पाहिल्यानंतर, ते आणि त्यांचे शिष्टमंडळ त्या खोलीत जातात, जिथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान (Recep Tayyip Erdogan) यांची बंद दाराआड (Closed-door) बैठक सुरू होती.
13 Dec 2025 01:55 PM (IST)
जॉन सीनाने WWE मध्ये लाखो चाहत्यांना अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. गेल्या २३ वर्षांत, त्याने WWE चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे, तो सर्वकालीन महान खेळाडू बनला आहे. २३ वर्षांत त्याने करोडो चाहत्यांच्या मनं जिंकले आहे, त्याचे भरपूर मनोरंजन केले आहे. तथापि, काही तासांत, त्याची ऐतिहासिक कुस्ती कारकीर्द संपुष्टात येईल. १७ वेळा माजी वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनच्या निवृत्तीची उलटी गिनती सुरू झाली आहे. हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा असा प्रश्न अनेकांना पडेल. चला संपूर्ण तपशीलांवर एक नजर टाकूया.
13 Dec 2025 01:45 PM (IST)
भारतीय रेल्वेने दक्षिण, पूर्व आणि मध्य भारतामध्ये आपला हाय-स्पीड कार्गो नेटवर्क आणखी वाढवण्यासाठी तीन नवीन फ्रेट कॉरिडॉरवर काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे, प्रस्तावित ३ फ्रेट कॉरिडॉरपैकी २ कॉरिडॉर महाराष्ट्रातून जात आहेत. या तीन नवीन मार्गांसाठीचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण झाले असून, त्यांची तपासणी सुरू आहे. या प्रकल्पांवर अंदाजे १.५ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तांत्रिक व्यवहार्यता, वाहतूक क्षमता आणि निधीची उपलब्धता यावर आधारित प्रथम कमीतकमी एका कॉरिडॉरची निवड केली जाईल.
13 Dec 2025 01:35 PM (IST)
भारताचा संघ सध्या टी20 मालिका खेळत आहे, या मालिकेमध्ये भारताच्या संघामध्ये हर्षित राणा याला संघामध्ये स्थान मिळाल्यामुळे मोहम्मद सिराज याला भारतीय संघामधून मागील अनेक महिन्यापासून वगळले जात आहे. सध्या तरी तो फक्त टेस्ट क्रिकेट खेळताना दिसत आहे. भारताच्या संघामध्ये त्याला न मिळाल्यामुळे तो सध्या देशातंर्गत सामने खेळताना दिसत आहे. भारतीय टी-२० संघात स्थान मिळवू न शकलेला मोहम्मद सिराज सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहे.
13 Dec 2025 01:25 PM (IST)
“विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या भूमिकेला आम्ही फार महत्त्व देत नाही. यापूर्वीही या मुदद्यावरून आमचा आणि काँग्रेसचा वाद झाला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांची सहमती आहे. काँग्रेसनं कितीही आपटली तरी विदर्भ वेगळा होणार नाही. हे त्यांचं राजकारण आहे. आणि भाजपनं कितीही प्रयत्न केला तरीही मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. भाजपनं कितीही प्रयत्न केला तरीही मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. पण आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भूमिकेवर एकत्र आहेत. पण जर कोणी वेगळ्या विदर्भाचे स्वप्न पाहत असेल तर स्वप्न भंग होईल, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
13 Dec 2025 01:16 PM (IST)
सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला ट्रेनमध्ये इतका भयकंर अनुभव आला आहे की, पुन्हा प्रवास करताना तिचा भीतीने थरकाप उडेल. बिहारमध्ये ही घटना घडली असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घडलं असे की, एक महिला ट्रेनन प्रवास करत होती. यावेळी ती वॉशरुमला गेली असताना ट्रेन एका स्टेशनवर थांबली होती. मात्र स्टेशनवर लोक चढल्यानंतर तिच्यासोबत भयकंर घटना घडली आहे. महिलेने स्वत: आपल्यासोबत घडलेल्या अनुभवाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
13 Dec 2025 12:47 PM (IST)
India vs South africa 3rd T20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचे दोन सामने आतापर्यत खेळवण्यात आले आहेत पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कौतुकास्पद कामगिरी केली होती. तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या हाती निराशा लागली. दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये बरोबरी केली आहे. आता तिसरा सामना 14 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे.
13 Dec 2025 12:40 PM (IST)
SHAH RUKH KHAN MEETS MESSI - VIDEO OF THE DAY. ❤️
- King of Indian Cinema & GOAT of Football. [PTI] pic.twitter.com/tQ3dCeGSOh
— Johns. (@CricCrazyJohns) December 13, 2025
13 Dec 2025 11:39 AM (IST)
भारतीय फुटबॉल चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 14 वर्षांनंतर भारतात दाखल झाला आहे. ‘GOAT इंडिया टूर 2025’च्या निमित्ताने तो तीन दिवस भारतात राहणार असून कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या चार शहरांना भेट देणार आहे. मेस्सी पहाटे 1.30 वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत बार्सिलोनाचा माजी सहकारी लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा संघमित्र रॉड्रिगो डी पॉल होते. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मेस्सी फुटबॉल सामना खेळणार आहे.
कोलकात्यात मेस्सीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो चाहत्यांनी अर्जेंटिनाची जर्सी, झेंडे आणि बॅनर घेऊन रस्त्यावर गर्दी केली होती. रीजन्सी हॉटेलबाहेर चाहत्यांनी तासन्तास ‘मेस्सी, मेस्सी!’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मेस्सीला मागील प्रवेशद्वारातून हॉटेलमध्ये नेण्यात आले. UNICEF चा ब्रँड अँबेसेडर असलेला मेस्सी या टूरच्या माध्यमातून भारतात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.
13 Dec 2025 11:18 AM (IST)
दिल्ली – एनसीआरमधील अॅपल चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून अॅपल आणि आयफोन चाहते ज्या क्षणाची वाट बघत होते, तो क्षण आता अखेर आला आहे. दिल्लीमध्ये नवीन अॅपल स्टोअर ओपन करण्यात आले आहे. 11 डिसेंबर रोजी दिल्लीतील नोएडा शहरामधील DLF मॉल ऑफ इंडियामध्ये अॅपलने त्यांचे नवीन रिटेल स्टोअर ओपन केले आहे. सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजेच हे कंपनीचे भारतातील पाचवे आणि एनसीआरमधील दुसरे अॅपल स्टोअर आहे. यापूर्वी कंपनीने दिल्लीतील साकेतमध्ये त्यांचे स्टोअर ओपन केले होते. आता कंपनीने भारतात कंपनीचा विस्तार करत दिल्लीमध्ये त्यांचे नवीन रिटेल स्टोअर ओपन केले आहे.
13 Dec 2025 10:59 AM (IST)
Huawei Mate X7 हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये लेटेस्ट बुक-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन लाँचच्या एका महिन्यानंतर Huawei Mate X7 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. नवीन Mate X7 मॉडेल Kirin 9030 Pro चिपसेटवर आधारित आहे, यासोबतच 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजने हा स्मार्टफोन सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 8-इंच इंटरनल डिस्प्ले आणि 6.49-इंच कवर डिस्प्ले दिला आहे. Huawei Mate X7 च्या दुसऱ्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तीन आउटवर्ड फेसिंग कॅमेरे, Huawei चा HarmonyOS 6.0 ऑपरेटिंग सिस्टम आणि दोन 8-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरे समाविष्ट आहे.
13 Dec 2025 10:49 AM (IST)
संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाची शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांकडून वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुक यांची कशा प्रकारे हत्या केली. याचे पुरावे न्यायाधिशांसमोर सादर केले. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले, विष्णु चाटे आणि त्याच्या साथीदारांनी कशी मारहाण केली, मारहाण केल्यानंतर त्यांच्या तोंडात लघवी केली होती. या सगळ्याचे व्हिडीओही उच्च न्यायालयात सादर करण्यात आले, मारहाणीचे व्हिडीओ सुनावणीदरम्यान सुरू असताना संतोष देशमुखांची पत्नी आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना हे व्हिडीओ पाहून रडू कोसळलं.santosh deshmukh murder case
13 Dec 2025 10:41 AM (IST)
शनिवारी रात्रीचा मुख्य कार्यक्रम वॉशिंग्टन, डी.सी. येथून थेट प्रसारित होईल. कंपनीने या शोसाठी चार प्रमुख सामने आयोजित केले आहेत. गुंथरने अलीकडेच द लास्ट टाइम इज नाऊ स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला आणि सीनाला निवृत्त करण्याचा मान मिळवला. काही अहवालांनुसार सीना-गुंथर सामना प्रथम होऊ शकतो. WWE ने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
13 Dec 2025 10:37 AM (IST)
कोविड-१९ ( COVID-19) लसींच्या सुरक्षिततेबद्दल जगभरात चर्चा सुरू असताना, अमेरिकेतून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेची औषध नियामक संस्था, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA), कोविड लसींच्या पॅकेजिंगवर ‘ब्लॅक बॉक्स चेतावणी’ (Black Box Warning) जोडण्याचा विचार करत आहे. ब्लॅक बॉक्स चेतावणी (Black Box Warning) ही एफडीएची सर्वात कडक आणि गंभीर चेतावणी मानली जाते. हा इशारा औषधाच्या पॅकेजच्या वरच्या बाजूला एका काळ्या बॉक्समध्ये छापलेला असतो, जो दर्शवितो की या औषधामुळे दुर्मिळ परंतु गंभीर गुंतागुंत (Serious Complications) किंवा जीवघेण्या प्रतिक्रिया (Life-Threatening Reactions) होण्याची शक्यता आहे. ही वॉर्निंग आधीच ओपिओइड वेदनाशामक (Opioid Painkillers) आणि अॅक्युटेनसारख्या औषधांना लागू आहे.
13 Dec 2025 10:29 AM (IST)
आगामी आयसीसी पुरुष अंडर-१९ विश्वचषकाच्या तयारीसाठीही ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. १४ डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानच्या अंडर-१९ संघांमधील सामना चाहते कुठे पाहू शकतात ते जाणून घेऊया. या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग ही सोनी लिव्ह अॅपवर क्रिकेट चाहते पाहु शकतात. यासाठी तुम्हाला सोनी लिव्ह अॅपचे सबस्क्रिबशन असने गरजेचे आहे.
13 Dec 2025 10:22 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी थायलंड (Thailand) आणि कंबोडियातील प्राणघातक संघर्ष थांबवल्याचा दावा केला आहे. त्यांनी दोन्ही देश पुन्हा युद्धबंदीसाठी सहमत झाल्या म्हटले आहे. मात्र अद्यापही सीमेवर जोरदार गोळीबार सुरुच आहे. कंबोडियाने थाई सैनिक ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही त्यांच्या सैन्यावर हल्ला करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
13 Dec 2025 10:14 AM (IST)
केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत त्यातून सर्वसामान्यांना फायदाही चांगला होताना दिसत आहे. त्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) चे नाव आता बदलण्यात येत असून, ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ असे केले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन प्रमुख आणि महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले आहे. मनरेगा व्यतिरिक्त, अणुऊर्जा विधेयक आणि उच्च शिक्षण विधेयकालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार असल्याचे समोर आले आहे.
13 Dec 2025 10:06 AM (IST)
२०१९ मध्ये तुरुंगात लैंगिक तस्करीच्या आरोपांवर खटल्याची वाट पाहत असताना दोषी ठरलेला लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन याच्या मृत्यूने जगभरात खळबळ उडाली होती. आता, या प्रकरणाला पुन्हा एकदा मोठे वळण मिळाले आहे. डेमोक्रॅट्सच्या नेतृत्वाखालील अमेरिकन (America) हाऊस ओव्हरसाईट कमिटीने (House Oversight Committee) शुक्रवारी एपस्टाईनच्या इस्टेटमधून मिळवलेले १९ निवडक फोटो (Selected Photos) प्रसिद्ध केले, ज्यामुळे अमेरिकेच्या राजकारण आणि उच्चभ्रू वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या फोटोंमध्ये अनेक सर्वाधिक प्रभावशाली व्यक्ती (Most Influential People) दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा एक काळा आणि पांढरा फोटो देखील यापैकी एक आहे, ज्यामध्ये ते अनेक महिलांनी वेढलेले दिसत आहेत (यातील सहा महिलांचे चेहरे अस्पष्ट करण्यात आले आहेत).
13 Dec 2025 09:45 AM (IST)
नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तापमानात घसरण होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यात उत्तर भारतात तीव्र थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक राज्यांतील तापमान शून्यापेक्षाही खाली गेल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांत तीव्र थंडी, दाट धुके आणि प्रदूषणाच्या एकत्रित परिणामांना तोंड देत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये पारा गोठणबिंदूच्या खाली गेला आहे.
13 Dec 2025 09:40 AM (IST)
The agreement between ICC and JioStar remains in effect : जिओस्टार विश्वचषक सामने प्रसारित करणार नाही अशा बातम्या समोर येत होत्या. या निर्णयामागील आर्थिक तोटा हे कारण असल्याचे म्हटले जात होते. तथापि, जिओस्टारनकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले आहे की, ते आयसीसीसोबतचा करार कायम ठेवणार आहेत. आयसीसी टी२० विश्वचषक सुरू होण्यास अवघ्या ६० दिवसांपेक्षा कमी वेळ बाकी असताना भारताच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
13 Dec 2025 09:35 AM (IST)
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात विविध आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. असे असताना आता अमरावतीत तारण म्हणून ठेवलेल्या कृषी मालाची परस्पर विक्री करून तब्बल ३ कोटी ५४ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेच्या पत्रावरून बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
13 Dec 2025 09:30 AM (IST)
Under-19 Asia Cup : शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या अंडर १९ आशिया कपच्या पहिल्या सामन्यामध्ये भारतीय स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकाच्या जोरावर भारत १९ वर्षांखालील संघाने आशिया कप स्पर्धेत युएई १९ वर्षांखालील संघासमोर ५० षटकांत ६ बाद ४३३ धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या युएईचा संघ मात्र ७ बाद १९९ धावाच करू शकला आणि भारताने युएईचा २३४ धावांनी पराभूत केले. १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात ४३३ ही भारताची अंडर १९ एकदिवसीय सामन्यातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या असून अंडर-१९ आशिया कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
13 Dec 2025 09:25 AM (IST)
संयुक्त राष्ट्रांच्या छळविरोधी विशेष प्रतिनिधी अॅलिस जिल एडवर्ड्स यांनी पाकिस्तान सरकारकडे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा एकांतवास आणि अमानवीय नजरकैदेच्या अटी तात्काळ संपवण्याची मागणी केली आहे. १२ डिसेंबर २०२५ रोजी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे त्यांनी इशारा दिला की सध्याच्या अटी छळ किंवा अमानवीय वागणुकीच्या श्रेणीत मोडू शकतात.
13 Dec 2025 09:25 AM (IST)
India vs Pakistan U19 Asia Cup : आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) पुरुष अंडर १९ आशिया कप २०२५ १२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) पुरुष अंडर १९ या स्पर्धेचा भारताचा काल पहिला सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने यूएईविरुद्ध दमदार विजय मिळवला आणि पहिला विजय नावावर केला आहे. आता भारताचा पुढील सामना हा पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना भारताच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे.
13 Dec 2025 09:20 AM (IST)
भारताचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये मोहम्मद सिराज आणि यशस्वी जयस्वाल यांसारखे खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे बीसीसीआयवर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. तर भारतामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीचे सामने देखील खेळवले जात आहेत. भारतीय टी-२० संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार गोलंदाजी करून मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
13 Dec 2025 09:15 AM (IST)
येत्या रविवारी (१४ डिसेंबर) नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महायुतीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता असतानाच, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र कुणीही उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी एकावृत्तवाहिनीशी बोलताना, संघाच्या बौद्धिकाला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, मागील वर्षीदेखील अजित पवार गटाचा कुणीही नेता संघाच्या बौद्धिकाला उपस्थित राहिला नव्हता.
13 Dec 2025 09:15 AM (IST)






