नवी दिल्ली– पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election 2024) सगळ्याच राजकीय पक्षांची तयारी सुरु झालेली आहे. त्यापूर्वी या वर्षी होणाऱ्या 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पूर्वपरीक्षा ठरणार आहेत. या राज्यांत कोणाला यश मिळणार, यावर 2024 सालातील लोकसभा निवडणुकांचा मतदारांचा कौल स्पष्ट होणार असल्याचं मानण्यात येतंय. यावेळी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठीची गणितंही बदलेली आहेत.
मतदारांच्या मनात नेमकं चाललंय…
2019 साली भाजपाप्रणित एनडीएसोबत असलेले नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांनी कूस बदललेली आहे. ते आता युपीएत सामील झालेले आहेत. उ. प्रदेशात गेल्या वेळी सपा आणि बसपाने एकत्र निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र वेगळं चित्र असणार आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी देशातील मतदारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, याचा सर्वे करण्यात आला. यात काही राज्यांत भाजपाला अधिक फायदा तर काही राज्यांत भाजपाला नुकसान होणार असल्याचं समोर आलंय. आजतकने केलेल्या या सर्वेक्षणात महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.
तीन राज्यांत भाजपाची डोकेदुखी वाढणार
आज जर लोकसभा निवडणुका झाल्या तर देशातील 3 राज्यांत भाजपाला मोठं नुकसान सहन करावं लागेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे. तर यूपीएला या राज्यांत चांगला फायदा होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
राज्य पक्ष यंदाचा अंदाज 2019च्या जागा
1. कर्नाटक यूपीए 17 02
2. महाराष्ट्र यूपीए 34 06
3. बिहार यूपीए 25 01
यातल्या कर्नाटक राज्यात लोकसभेच्या आधी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तर महाराष्ट्राचा विचार केल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाणं, हे भाजपाला तोट्याचं ठरेल असं दिसतंय. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यानं त्याचा फटका बसण्याची चिन्ह आहेत. नितीश कुमार यांना सध्या राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले असून, ते विरोधकांच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचं मानण्यात येतंय.
भाजपाला कोणत्या राज्यात होणार फायदा ?
मात्र अशी काही मोठी राज्य आहेत, ज्यात भाजपाला या निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. त्यात उ. प्रदेशात भाजपाला 70 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा 6 जागा वाढताना दिसतायेत. 2014 च्या निवडणुकांप्रमाणे भाजपा उ. प्रदेशात करिष्मा करण्याच्या तयारीत असेल. तर आसाममध्ये भाजपाला 14 जागा मिळतील. गेल्या वेळी ही संख्या 12 होती. तर प. बंगालात ममता बॅनर्जींशी दोन हात करणाऱ्या भाजपाला फायदा होईल. यावेळी तिथं 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. ज्या गेल्या वेळी 18 होत्या. तेलंगणातही भाजपाला दोन जागांचा फायदा होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपाला तेलंगणात 6 जागा मिळतील.
कोणत्या पक्षाला लोकसभेत किती जागा
भाजपाला 3 राज्यांत फटका बसणार असला तरी सरकार भाजपाचेच येईल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आज निवडणुका झाल्या तर एनडीएला 298 जागा, यूपीएला 153 जागा तर इतरांना 92 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएच्या मतांच्या टक्केवारीतही घट होण्याची शक्यता आहे. 2019 साली एनडीएला 60 टक्के मतं मिळाली होती, ती यावेळी 43 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यूपीएला 29 टक्के मते मिळतील. वेगवेगळ्या पक्षांचा विचार केल्यास आज निवडणुका झाल्या तर भाजपाला 284, काँग्रेसला 68 आणि इतरांना 191 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.