बीड : राज्याच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शक असलेल्या आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) संचालक असलेल्या परळी येथील दी. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेला बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटी शर्थीचे तसेच कोट्यवधींच्या गैरव्यवहारासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळं पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काय म्हटलंय नोटीसात?
दरम्यान, ही नोटीस २४ जानेवारीला पाठवण्यात आली आहे, तर ३१ जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे बँकेला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. कळंब (जि. उस्मानाबाद) येथील शंभू महादेव कारखान्याच्या लिलावात अटी, शर्थीचे उल्लंघन केल्याचा वैद्यनाथ बँकेवर आरोप आहे. असं या नोटीसात म्हटलं आहे. दरम्यान, वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे सभासद सुभाष कारभारी निर्मळ रा. आर्य समाज मंदिराजवळ, परळी यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात ५ जानेवारी २०२३ रोजी अर्ज देऊन गैरव्यवहराची चौकशी करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती.
प्रकरण काय आहे?
वैद्यानाथ बँकेकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शंभूमाहादेव कारखाना गहाण होता. कारखान्याने वेळेत कर्ज परत न केल्याने कारखाना लिलावात काढण्यात आला. मात्र, या लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तींचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.






