Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
21 Jan 2026 10:50 AM (IST)
प्रसिद्ध विनोदी कलाकार झाकीर खान सध्या त्याच्या “पापा यार” या कॉमेडी स्पेशल शोमुळे चर्चेत आहे. अलिकडेच त्याने हैदराबादमध्ये त्याचा नवा कार्यक्रम सादर केला. शो दरम्यान झाकीर खान याने त्याच्या चाहत्यांना एक मोठी घोषणा करून त्यांना आश्चर्यचकित केले. खरं तर, झाकीर खान याने चालू शो दरम्यान विनोदातून ब्रेक घेण्याची घोषणा केली. तो काही वर्षांसाठी मोठा ब्रेक घेत आहे. अभिनेत्याने त्याच्या घोषणेमागील कारण देखील स्पष्ट केले. झाकीर खान काय म्हणाला ते जाणून घेऊया.
21 Jan 2026 10:40 AM (IST)
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज अंतिम सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी पार पडणारआहे. सलग दोन दिवस युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश यावर निकाल देणार आहेत. त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
21 Jan 2026 10:30 AM (IST)
पुणे शहरात १९ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तब्बल ३५ देशांतील १७१ हून अधिक आंतरराष्ट्रीय सायकलपट्टूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचे पहिल्या टप्प्याचे आयोजन गुडलक ते सभांजी चौक या दरम्यान करण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यात हिंजेवाडी येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान हिंजेवाडील सायकलिंगमध्ये एका देशा सायकलपट्टूने लोकांचे लक्ष वेधले आहे. हा सायकलपट्टू २०-२४ वर्षाचा नव्हे तर ७० वर्षाचा तरुण आहे.
21 Jan 2026 10:15 AM (IST)
जागतिक राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत जगातील अनेक देशांना व्यापार आणि शुल्काच्या मुद्द्यावरून धमकावण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे रशियाने या ‘दादागिरी’ला उत्तर देण्यासाठी आपला जुना आणि शक्तिशाली पत्ता बाहेर काढला आहे. रशियाचे अनुभवी परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी त्यांच्या वार्षिक पत्रकार परिषदेत ‘आरआयसी’ (Russia-India-China – RIC) त्रिपक्षीय संवाद पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
21 Jan 2026 10:05 AM (IST)
भारतीय वंशाची ‘स्पेस क्वीन’ आणि जगातील सर्वात धाडसी अंतराळवीरांपैकी एक असलेल्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी २७ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर नासामधून (NASA) निवृत्ती घेतली आहे. नासाने मंगळवारी रात्री अधिकृत घोषणा केली की, सुनीता विल्यम्स यांची निवृत्ती २७ डिसेंबर २०२५ पासून लागू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका ऐतिहासिक आणि आव्हानात्मक मोहिमेनंतर त्यांनी अंतराळ गणवेश (Space Suit) उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
21 Jan 2026 10:00 AM (IST)
Bigg Boss Marathi 6 मधील राधा पाटीलने मैत्रिण अनुश्रीसोबत तिच्या बॉयफ्रेंडबाबत बोलताना काही खुलासे केले आहेत. तिच्या बॉयफ्रेंडचे नेमकं नाव काय आहे हे प्रेक्षकांना समजलेलं नाही. नावाचा उल्लेख टेलिकास्ट करताना म्यूट करण्यात आला आहे.
राधा पाटील गप्पा मारताना म्हणाली,” आम्ही 2 बीएचके मध्ये राहतो, आमचा बेडरूम वेगळा आहे. बाकी मुलींसाठी रूम वेगळी आहे.आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. त्याचा स्वभाव असा आहे ना मला जर कोण काही बोललं तर, तो कोणालाच ठेवणार नाही. त्याला कोणतेही व्यसन नाही. तीन वर्षात तो स्वत:च्या हाताने कधी जेवला नाही. माझ्याच हाताने जेवतो. त्यामुळे मला राहून राहून वाटतंय.. मी बिग बॉसच्या घरात आल्यावर त्याचं काय होत असेल? कसं होत असेल? मुलींची अशी एक इच्छा असते, देसी बॉय पाहिजे. अगदी तसाच आहे तो.”
21 Jan 2026 09:57 AM (IST)
गडचिरोली: गडचिरोली येथून भीषण अपघाताची एक घटना समोर आली आहे. अंत्यविधी आटोपून घरी जात असताना चारचाकी वाहन नदीत कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील खमनचेरू-बोरी दरम्यान असलेल्या दीना नदी पुलावर घडली.
21 Jan 2026 09:30 AM (IST)
विद्यार्थ्यांचे भविष्य, सुरक्षितता आणि संस्कार घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, त्या शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ५५ वर्षीय शिक्षकाने खाऊचे आमिष दाखवून ९ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समोर येताच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
21 Jan 2026 09:17 AM (IST)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 2-1 असा पराभव केला. विशेष म्हणजे, 38 वर्षांच्या इतिहासात न्यूझीलंडने प्रथमच भारतात येऊन एकदिवसीय मालिकेत टीम इंडियावर मात केली आहे.
एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज नागपूर येथे रंगणार असून संध्याकाळी 7 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे.
ही टी-20 मालिका आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वीच सूर्यकुमार यादव यांनी संघाच्या फलंदाजी क्रमाबाबत मोठा खुलासा केला आहे.
21 Jan 2026 09:14 AM (IST)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अनुदानाचा हफ्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महिलांची निराशा झाली आहे. आता यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. वाचा सविस्तर-
21 Jan 2026 09:12 AM (IST)
नागपूर येथे आज होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत. सामन्याच्या काळात वर्धा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता आज, 21 जानेवारी रोजी, मॅचदरम्यान वर्धा मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच, पोलिसांकडून मैदान परिसरात वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली असून स्टेडियमकडे वाहन ये-जा करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग आखून देण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.
21 Jan 2026 09:11 AM (IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महापौरपद आपल्याकडे राहावे, यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या सत्तासंघर्षामुळे शहरात नाट्यमय आणि चक्रावून टाकणाऱ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गट आणि मनसेचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, मंगळवारी कोकण भवन येथे गट नोंदणीच्या वेळी ठाकरे गटाचे केवळ सात नगरसेवक उपस्थित राहिले.
India Share Market Update: भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज बुधवारी सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,३०४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४५ अंकांनी जास्त होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगात होत आहे.






