बीड- अपघातात गंभीर जखमी झालेले म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार (MLA) धनंजय मुंडे (Dhanjay Munde) हे सध्या उपचार घेताहेत. पंधरा ते वीस दिवसांपूर्वी बीडमध्ये धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. मात्र आता त्यांची प्रकृती बरी असून, बेडवरुनच धनंजय मुंडे यांनी खणखणीत भाषण केले आहे. येणाऱ्या काळात मराठवाड्यातील सर्व निवडणुका (Election) महाविकास आघाडी जिंकणार असून, दळभद्री भाजप सरकारच्या हाती काहीच मिळणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर तसेच शिंदे गटावर मुंडेंनी टिका केली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, ‘आपल्या सर्वांच्या कृपेने मी अपघातातून बचावलो आहे. अशा पद्धतीने बेडवरून आपल्या सर्वांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधेल असे मी स्वप्नात ही पाहिले नाही’ अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलीय. धनंजय मुंडे अपघातातून बरे झाले आहे. पण, त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ परळी येथे आयोजित मेळाव्यात ऑनलाईन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
विक्रम काळे यांना चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजय मिळणार आहे, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. ते पुढे बोलतांना म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षाने एक उचल्या उमेदवार उचलून आणला आहे, हे फार दुर्दैव आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला 7 पिढ्या जरी गेल्या तरी विक्रम काळे यांच्यासारखा उमेदवार मिळणार नाही. येणाऱ्या काळातील मराठवाड्यातील सर्व निवडणूक ही महाविकास आघाडी जिंकणार आणि या दळभद्री भाजप सरकारला हाती काहीच मिळणार नाही, अशी टिका करत धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला.