सोलापूर: “काय झाडी…, काय हाटेल, काय डोंगर…”, या डायलॉने एका रात्रीत प्रसिद्ध झालेले, शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत असतात. “काय झाडी…, काय हाटेल, काय डोंगर…”, या डायलॉने पाटील एका रात्रीत नावारुपाला आले. तसेच शहाजीबापू पाटील यांनी सध्या देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. मात्र भविष्यामध्ये निश्चितच पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता आणि शक्ती नितीन गडकरी यांच्यामध्येच आहे, असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलं आहे.
राजकीय चर्चांना उधाण
दरम्यान, शहाजी बापू यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं असून, अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सी व्होटरचा सर्व्हे आला आहे. त्यात भाजप विरोधात जनमत असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हेच पुन्हा सांगितलं. त्यावरही शहाजी बापू पाटील यांनी मत व्यक्त केलं. भाजपा विरोधात जनमत आहे हे शरद पवार साहेबांचं मत व्यक्तिश: आपणास मान्य नाही. भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या कारभाराबाबत जनता समाधानी आणि सुखी आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला.
युतीचा कुठेही फटका बसणार नाही
एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे तैलचित्र सभागृहात लावून वारसदार होत नाही हे संजय राऊत यांचे मत चुकीचे आहे, असा पलटवार त्यांनी केला. राजकारणात वारस हा विचारांचा ठरत असतो. एकनाथ शिंदे हे राजकीय आणि वैचारिक दृष्ट्याच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. असं देखील पाटील म्हणाले. शिंदे गटाला वंचित आणि शिवसेनेच्या युतीचा कुठेही फटका बसणार नाही, असं पाटील म्हणाले.