PM Naredra Modi (Photo Credit- X)
PM Narendra Modi Speech: देशाच्या नागरिकांना रविवारी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्यापासून जीएसटी बचत महोत्सव सुरू होत असल्याची घोषणा केली. या महोत्सवामुळे सर्वसामान्यांची बचत वाढेल, तसेच त्यांना हव्या असलेल्या वस्तू अधिक सहजपणे खरेदी करता येतील, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हा बचत महोत्सव देशातील प्रत्येक नागरिकासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे ग्राहकांना खरेदी करताना मोठी सूट मिळेल आणि देशाच्या विकासालाही गती मिळेल.”
#WATCH | Prime Minister Narendra Modi says, “Tyohaaro ke iss mausam mein sabka muh meetha hoga. Desh ke har pariwar ki khushiya badhegi… I extend my heartfelt congratulations and best wishes to millions of families across the country for the Next Generation GST reforms and… pic.twitter.com/by2clKMGPR
— ANI (@ANI) September 21, 2025
पंतप्रधानांनी जीएसटी लागू होण्यापूर्वीच्या परिस्थितीची आठवण करून दिली. ते म्हणाले, “पूर्वी देशातील नागरिकांना विविध करांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकावे लागत होते. तसेच, एका शहरातून दुसऱ्या शहरात वस्तू पाठवणेही खूप कठीण होते. ग्राहकांना अनेकदा शिपिंगचा अतिरिक्त खर्चही द्यावा लागत होता.”
२०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर देशात कर सुधारणांचा एक नवा अध्याय सुरू झाला. पंतप्रधान मोदींनी जीएसटीला स्वतंत्र भारताची सर्वात मोठी कर सुधारणा म्हटले. त्यांनी सांगितले की, ‘ही सुधारणा सर्व घटकांना सोबत घेऊन करण्यात आली असून, ती देशाच्या विकासगाथेला आणखी गती देईल.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ‘स्वदेशी’ आणि उत्पादनांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, “भारतात बनलेल्या वस्तूंची गुणवत्ता पूर्वीही सर्वोत्तम होती. आता आपल्याला तो गौरव पुन्हा प्राप्त करायचा आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, लघु उद्योगांनी असे उत्पादन तयार करावे, जे जगाच्या बाजारपेठेत अभिमानाने आणि प्रत्येक कसोटीवर खरे उतरतील. याच ध्येयाने आपल्याला काम करायचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ज्याप्रमाणे ‘स्वदेश’ या मंत्राने बळ दिले, त्याचप्रमाणे समृद्धीलाही ‘स्वदेशी’च्या मंत्रानेच बळ मिळेल.
GST 2.0: उद्यापासून नवीन GST दर लागू होणार; ‘या’ वस्तू GST मुक्त असतील, पहा संपूर्ण यादी
‘जाणूनबुजून किंवा नकळत कितीतरी परदेशी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत, हे आपल्याला कळतही नाही. आता आपल्याला स्वदेशी वस्तूंवर लक्ष केंद्रित करावे लागेल. ‘आपण स्वदेशी आहोत आणि स्वदेशीच विकतो’, असे अभिमानाने सांगा,’ असे आवाहन त्यांनी केले. असे झाल्यास भारताचा विकास अधिक वेगाने होईल, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी सर्व राज्य सरकारांना ‘आत्मनिर्भर भारत’ आणि स्वदेशी अभियानासोबत जोडून आपल्या राज्यात उत्पादन क्षेत्राला गती देण्याचे आवाहन केले. देशातील प्रत्येक राज्य विकसित व्हावे आणि भारत एक विकसित राष्ट्र बनावे, यासाठी गुंतवणुकीचे चांगले वातावरण तयार करा, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आता जीएसटीमध्ये केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टॅक्स स्लॅब असतील. यामुळे, खाण्या-पिण्याच्या वस्तू, औषधे आणि इतर अनेक वस्तू स्वस्त होतील किंवा त्यांच्यावर फक्त ५ टक्के कर लागेल.पंतप्रधान मोदींनी सांगितले की, जीएसटीच्या या नवीन रचनेमुळे जवळपास ९९ टक्के वस्तू आता ५ टक्के कराच्या कक्षेत आल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांची मोठी बचत होईल.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशातील २५ कोटींहून अधिक लोकांनी भारताला प्रगतीच्या दिशेने पुढे नेले आहे. हा समूह ‘नवीन मध्यमवर्ग’ म्हणून एक मोठी भूमिका बजावत आहे आणि त्यांची स्वतःची स्वप्ने आहेत. या नवीन मध्यमवर्गाला लक्षात घेऊन, सरकारने या वर्षी १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करमुक्त करून त्यांना एक मोठी भेट दिली आहे.